You are currently viewing जिल्हा नियोजनची मिटींग घ्यायला पालकमंत्र्यांना वेळ नाही

जिल्हा नियोजनची मिटींग घ्यायला पालकमंत्र्यांना वेळ नाही

आमदार नितेश राणेंचा आरोप

कणकवली

ज्या – ज्या मागण्या केल्या त्या अद्याप पूर्ण नाहीत.त्यामुळे अजून मागून काय मिळणार. जिल्हा नियोजन ची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावली जात नाही. 6 ते ८ महिने झाले ही बैठक झालेली नाही. भविष्यात होईल याची शक्यता नाही. शेतकऱ्यांना मदत नाही तसेच रस्त्यानाही पैसे नाहीत. कुडाळ- मालवण चे आमदार फक्त कोटी,कोटीच्या घोषणा करतात मात्र पैसे खड्ड्यात पडले आणि रस्ते गुळगुळीत झाले असे कुठे दिसत नाही. जिल्ह्याच्या विकासाला कोणच वाली नाही. पालकमंत्री जिल्हात कुठे दिसत नाही की विकास कामे होत नाहीत. आता नाटके सुद्धा सुरू झाली आहेत. पालकमंत्र्यांना नाटके पाहायला आवडतात तेव्हा जिल्हा नियोजनाची बैठक लावाच परत रत्नागिरीला जायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिला. ते पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नांवर बोलत होते.

आमदार नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत केंद्रात मंत्री नितीन गडकरींना जाऊन भेटतात, त्यांच्या समोर शेपूट हलवता आणि पंतप्रधान मोदींवर टीका करतात.राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून एक रुपया आणू शकत नाहीत.ड्रग्सबद्दल बोलणारे शेतकऱ्यांबद्दल कधी बोलणार ? ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवृत्त केलंय. ड्रग्सबद्दल बोलायचं, एनसीबी बद्दल बोलायचं, पण शेतकऱ्यांन बद्दल बोलायचं नाही. ड्रग्स मधील श्रीमंतांची मुले सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीच करायचे नाही. ती काय खातात त्यांचे भविष्य असे असेल या बद्दल बोलायचे नाही. दिवसभर फक्त वसुली करायची हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या वाईट स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप आम.नितेश राणे यांनी केला.

सामंत बंधूंची वसुली अधिवेशनात मांडणार. पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कोणाकडून हफ्ते घेतात हे मी मंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत. या संदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सेनेच्या राजवटीत बाहेरून एलईडी, पर्सनेट मासेमारी वाढली असा आरोप राणे यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा