You are currently viewing सावंतवाडीत नव्याने आलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडून अपेक्षा वाढलेल्या.

सावंतवाडीत नव्याने आलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडून अपेक्षा वाढलेल्या.

जावडेकरांकडून अपेक्षाभंगच.

संपादकीय….

सावंतवाडी हे जिल्ह्यातील सर्वात सुंदर शहर, नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आणि बापूसाहेब महाराजांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण देशात ओळख. राजघराण्याचा वारसा लाभलेल्या शहरात देव पाटेकर आणि उपरकर यांच्या आशीर्वादाने शांती, संस्कृती, एकता, सुव्यवस्था टिकून आहे. गेल्या दोन वर्षात सावंतवाडीत सत्ता बदल झाल्यावर आणि मध्यंतरी वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे म्हणावा तसा विकास झालेला दिसून येत नाही. परंतु सावंतवाडी शहराच्या रखडलेल्या विकासाला दुसऱ्या बाजूने सावंतवाडीचे मुख्याधिकारी जावडेकर आणि सत्ताधारी यांच्यात न जुळलेलं सूत जास्त कारणीभूत असल्याचेच बोलले जात आहे. पहिल्या टर्ममध्ये सावंतवाडीत असलेले मुख्याधिकारी मालवण मध्ये काहीकाळ बदलीवर गेले, परंतु आमदार केसरकर यांची मेहेरनजर असल्याने पुन्हा सावंतवाडीत आलेल्या जावडेकरांचे कधीच सत्ताधारी गटाशी पटले नाही. त्यामुळे सावंतवाडीचा विकास रखडलेलाच राहिला. मुख्याधिकारी सावंतवाडीत असलेल्या मटका टपरीवर कारवाई करत राहिले, परंतु शहराच्या विकासासाठी अपेक्षित असे काम त्यांच्याकडून झालेले दिसून आले नाही. काही ठेकेदारांची देखील मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचं दिसून आली. त्यामुळे नव्याने सावंतवाडीत दाखल झालेल्या मुख्याधिकारी महापात्रा यांच्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
सावंतवाडीत गेल्या दोन वर्षात खराब झालेल्या पाण्याच्या लाईन मुळे दोन वेळा होत असलेला पाणीपुरवठा देखील अनपेक्षितपणे कमी झाला आहे, त्यामुळे पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, रखडलेले प्रकल्प, ड्रेनेज सिस्टीम, नव्याने झालेल्या इमारतींचे पांजरवाडा सारख्या एरियामध्ये गटार नसल्याने रस्त्यावर येणारे घाणीचे पाणी, अशा अनेक समस्या शहरात आ-वासून उभ्या आहेत. त्यामुळे नव्या मुख्याधिकाऱ्यांनी जनहिताच्या कामांसाठी योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.
संवाद मीडियाने अनेकवेळा शहरातील समस्यांवर प्रकाशझोत टाकलेला आहे परंतु सत्ताधारी आणि अधिकारी यांच्यात नसलेल्या समन्वयामुळे परिस्थिती जैसे थे राहिली आहे. त्यामुळे नव्या मुख्याधिकाऱ्यांनी अपेक्षित काम करून शहरवासीयांच्या मनात आपली जागा निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा