सिंधुदुर्ग साहित्य संघ, सावंतवाडीचे आयोजन
सावंतवाडीच्या साहित्याची ओळख असलेले कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृती अजरामर करत “अशा लाल मातीत जन्मास यावे, जीचा रंग रक्तास दे चेतना” या कविवर्य वसंत सावंत यांच्या काव्यपंक्तीची आठवण करत प्रा.केदार म्हसकर यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. सिंधुदुर्ग साहित्य संघ, सावंतवाडी आयोजित वार्षिक कोजागरी कवी संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ.अनिल धाकू कांबळी, नांदगाव, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून किरण गुरव, राधानगरी, डॉ रणधीर शिंदे, व डॉ नंदकुमार मोरे कोल्हापूर हे उपस्थित होते. जिल्हाभरातून अनेक नामवंत तसेच नवोदित कवी, साहित्यिक उपस्थित होते. कविवर्य डॉ.वसंत सावंत यांनी लावलेलं हे रोपटं यावर्षी ४९ वर्षे पूर्ण करत असून येणारं वर्ष हे ५० वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. येत्या वर्षात जास्तीतजास्त कार्यक्रम करून ५० वे वर्ष अजरामर करण्याचा मानस प्रा.प्रवीण बांदेकर यांनी बोलून दाखवला व उपस्थित संमेलनाध्यक्ष तसेच प्रमुख उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
वार्षिक कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी दादा मडकईकर यांच्या कवितेने कवींच्या काव्य वाचनास सुरुवात केली, यात प्रामुख्याने ज्येष्ठ कवी अजय कांडर, प्रा.शरयू आसोलकर, प्रा.गोविंद काजरेकर, कवयित्री उषा परब, कल्पना बांदेकर, कवी दीपक पटेकर, अंकुश परब, विठ्ठल कदम, स्नेहा कदम, प्रियदर्शनी पारकर, सौ मोहोळ, प्रवीण ठाकूर, श्वेतल परब, हर्षवर्धिनी जाधव, घाडी सर, किशोर वालावलकर, कल्पना मलये, सरिता पवार, निलम यादव, दिलीप चव्हाण, रामदास पारकर, दिलीप भाईप, आदींनी एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्या. उपस्थित रसिकांनी देखील त्यांना जोरदार दाद दिली. सरते शेवटी अध्यक्ष डॉ.अनिल कांबळी यांच्या दुआ आणि रमझान या कवितांनी संमेलनाचा समारोप करण्यात आला. तत्पूर्वी कवयित्री, लेखिका कल्पना मलये यांच्या “कारटो” या मालवणी कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कणकवलीचे चित्रकार नामानंद मोडक, प्रा.जाधव होळीकर, प्रा. गणेश मर्गज, सुरेश म्हसकर सर, बुवा सर, अनेक मान्यवर तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार आदी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुमेधा नाईक-धुरी आणि प्रा.गोविंद काजरेकर यांनी केले.