You are currently viewing दिवाळीच्या तोंडावर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

दिवाळीच्या तोंडावर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांची आज टास्कफोर्ससोबत बैठक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक मोठी बैठक होणार आहे. राज्यातल्या कोरोना उपाय सांगणाऱ्या टास्कफोर्ससोबत ही बैठक होतेय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिलेत.

पुढच्या काही दिवसात राज्यातल्या मॉल, दुकानं, हॉटेल्स याबाबत काही अटी नियम शिथिल होतील असे सरकारकडून संकेत मिळतायत, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सच्या बोलवलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालंय.

नेमके बदल काय होतील?

सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.

मुंबई लोकलबाबतही मोठा निर्णय?

मुंबई लोकलबाबतही मोठा निर्णय अपेक्षीत आहे. कालच आरोग्य मंत्री टोपेंनी त्याचेही संकेत दिलेत. सध्या ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेत, त्यांना प्रवासाची मुभा आहे. पण दिवाळीनंतर कदाचित यातही बदल होऊ शकतो, ज्यांचा एक डोस झालेला आहे त्यांनाही काही नियम अटींवर प्रवासाची परवानगी मिळेल अशी चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसात शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह खुली करण्यात आलीत.

बंद सभागृहातील 200 लोकांच्याच उपस्थितीची मर्यादाही हटवण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवासाचीही परवानगी द्या अशी मागणी होतेय आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. फक्त लोकलच नाही तर हॉटेल्स, मॉलमध्येही एक लस घेतलेल्यांना प्रवेश मिळण्याची चिन्हं आहेत. ह्या संदर्भातच आज मुख्यमंत्री टास्कफोर्सच्या तज्ञांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर निर्णय होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा