You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल क्लब जुगाराचे अधिकृत अड्डे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल क्लब जुगाराचे अधिकृत अड्डे

स्थानिक पोलिसांचा दुर्लक्ष…..का?

राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित झाला तो जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यामुळेच. निसर्गाचं वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कष्ट करणारे हात त्याचा योग्य वापर करतात परंतु रोजगाराच्या नावावर अवैद्य मार्गाने कमी कालावधीत जास्त पैसा कमविण्यासाठी झटणारे मात्र सरकारच्याच आयुधांची शस्त्रे बनवून वापर करतात. अशीच सरकारी आयुधे वापरून जिल्ह्यात 12 सोशल क्लब चालविले जात आहेत. यापैकी एकमेव सावंतवाडीतील सोशल क्लब हा अधिकृत असून इतर 11 सोशल क्लब हे खाकीच्या मेहेरनजर वर अनधिकृतरित्या सुरू आहेत.
सोशल क्लब म्हणजे बैठे खेळ खेळण्यासाठी परवाना दिला जातो, ज्यामध्ये कॅरम, पत्ते असे खेळ येतात. परंतु या खेळांमध्ये पत्त्याचे पैसे लावून खेळले जाणारे खेळ म्हणजे जुगार. सोशल क्लब च्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ जुगार खेळले जातात आणि स्थानिक पोलीस प्रशासन मात्र अशा लोकांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. या सोशल क्लब मध्ये अलीकडे वीस पंचविशीत आलेली तरुण पिढी ओढली जाऊ लागली आहे. ही तरुण मुले क्लब मध्ये गेली की इतर कोणाशी त्यांचा संपर्क येत नाही, आणि घरच्या कोणाला ती बाहेर फिरताना, टवाळी करताना आढळत नाही त्यामुळे आपली मुले काय करतात हे पालकांना देखील समजत नाही.
जिल्ह्याचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या कणकवलीत सुरू असलेल्या सोशल क्लब मध्ये रात्रीच्या वेळेस जुगार सुरू असतो, आणि कित्येक विशीतील तरुण त्यात जुगार खेळताना पहायला मिळतात. कणकवली मध्ये सुरू असलेल्या या सोशल क्लबला राजकीय वरदहस्त असल्याने आपले कोणीच वाकडे करू शकणार नाही याचं अविर्भावात अगदी निर्धास्तपणे इथे जुगार खेळला जातो. ज्यामुळे देशाचं भविष्य म्हटली जाणारी तरुण पिढी बरबादीच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याची गंभीर दखल घेऊन अशा सोशल नावावर उघडलेल्या जुगाराच्या क्लब च्या माध्यमातून जुगाराच्या अधीन होत असलेल्या तरुण पिढीला वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख नक्कीच याबाबत कठोर कारवाई करतील अशी आशा जिल्हावासीयांना आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा