*जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
झरझरझर ह्या धारा किती कोसळती
पावसास प्यारी धरती
ढग गडगडती मिलनास धरतीच्या
ते आतुर भारी असती ….
ही युगायगाची प्रीती
तापून लाल ती धरती
ढग तगमग करती वरती
नको तापवू रे .. येऊ दे प्रेमाला भरती..
पावसास प्यारी घरती ….
सूर्य तो ओततो आग
वणवे ही जागोजाग
हिरमुसती टाकून माना
जग तृषार्त हे… वृक्ष ही तापूनी निघती…
पावसास प्यारी धरती…
गडगडाट ढमाढम ढोल
मेघांचा सुटतो तोल
आतुर प्रिया भेटीस
वादळ येते..वीज ही ये लवलवती…
पावसास प्यारी धरती ….
धरणीवर लोळण घेतो
प्रियेस घट्ट बिलगे तो
तो सपसप सपसप येतो
“आसू गळती.. लाख सांडती मोती..”
पावसास प्यारी धरती…
मिलन धरा पाण्याचे
सौभाग्य पहा जगताचे
संकेत किती सृजनाचे
नव निर्माता.. पाऊस आणि धरती…
पावसास प्यारी धरती …
जीवन फुलते वसुंधरा पाचूची
ही युगायुगांची…..प्रीती….।।
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)