जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य लेखक, कवी श्री. श्रीकांत दीक्षित, पुणे यांचा अप्रतिम ललित लेख.
तुझ्या माझ्या एकांतात सारेच कसे हरवून गेले होते. डोळ्यातील भाव मला खुणावत होता. हो.. सारेच कसं मूकपणे.. नजरेची परिभाषा अगदी वेड लावून गेली. तुझ्य् विखुरलेल्या रेशमी केसांच्या बटा आज उगिचंच अव्हान देत होत्या. गालावर ओघळून कुतूहलाने माझ्याकडे पहात होत्या. तुझ्या आणि माझ्या एकांतात एक मिनमिनता दिवा मात्र तेवत होता. साक्षीला फक्त तोच होता. तो ही लाजून चूर झाला होता..अगदी तुझ्यासारखाच..झुकलेल्या पापण्यांनी नकळत मनी विहरत रहावे..अन् ते विहंगम दृष्य मी पहात रहावे.
तुझं आरस्पानी सौंदर्य पाहून रोमरोमात मेघमल्हार विलासतो.. किती गोडवे गावेत मी तुझे..पाठीची पन्हाळ, ओठांची किनार, पायीचे पैंजन..पैंजनाची छुमछुम, तुझं लटकण – मटकण चटकण जिव्हारी लावून जाते. काकणांची किनकिन या स्तब्ध रात्रीला ‘गुंज उठी शहनाई’ म्हणायला लावते..
आठवतंय का तुला..? श्रावणाच्या चाहुलीने कोसळणारा आषाढघन..अधिकच मुसळधार होता. अन् आपली आषाढमिठी अधिकच घट्ट झाली. तुझं अन् माझे भिजणे पावसाला सुध्दा आनंद देणारे.. सरीवर सरी झेलताना ओघळणाऱ्या थेंबाचे तळे पायशी उगिचंच घुटमळत होते. पाऊस असा तारूण्याच्या नव्या नव्हाळीचा..आज तोच अनुभव गर्दीतही भर दुपारी काळोख्या रात्रीचा. एकाच छत्रीतून चाललेल्या वाटांचा, ओलेत्या मिठीचा..थरथरत्या अधरांचा..त्या चावट क्षणांचा..छेडलेल्या तारांचा.. गायलेल्या रागांचा, उलगडलेल्या भावनांचा.. प्रकाशलेल्या दिव्यांचा.. किती किती या शब्दांच्या तिजोरीतील भावना..आज पुन्हा इतिहासाची पाने चाळताना..नेत्र गवाक्ष किलकिल करू लागलेत. आठवांचे पदर पुन्हा नव्याने उलगडताना नवलाईची नवीन भेट पुन्हा पुन्हा छळते मला…
केशरी पहाटेची सांगता मखमली ओठांच्या भेटीने व्हावी..तृप्त करणारा स्पंदनांचा हुंकार व तृप्तता व्हावी सकार..असाच तुझा माझा एकांत..!!
*श्रीकांत दीक्षित. ©*
*पुणे*