जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांच्या नात्या वर लिहिलेला एक अप्रतिम लेख.
डॉ.प्रतिभा जाधव
मला आजवर जेवढे मित्र मैत्रिणी-स्नेही लाभले ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे, ज्येष्ठ अशा वर्गात मोडणारे. खरे तर समवयस्क व्यक्तींपेक्षा ज्येष्ठ व्यक्तींशी माझे बंध छान जुळतात असा अनुभव आहे. त्यांच्याशी माझी वैचारिक देवाणघेवाण किंवा चर्चा उत्तमरीत्या होते. मग त्यात हैदराबादचे ८५ वर्षे वय असलेले माजी प्राचार्य मेहताकाका असोत वा नाशिकमधली आम्हा लिहित्या पोरींची आई ७२ वर्षांच्या प्रा. सुमतीताई पवार असोत. लेखनातून जोडलेली ही थोर माणसे आहेत.
काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप उशिरा येतात पण आयुष्य व्यापून टाकतात जणू काही फार जुनी कैक वर्षांची ओळख असावी अशा पद्धतीने आपण एकमेकांना नेमकेपणाने समजत जातो. ह्या व्यक्ती आपल्याला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करतात , अनुभवांच्या बोलांनी अचूक मार्ग आणि दिशा देत जातात. अशाच एका संस्मरणीय टप्प्यावर सुमतीताई मला तीन वर्षांपूर्वी भेटल्या. साहित्यसखी साहित्यिक महिला मंचने आयोजित अभिव्यक्ती महिला साहित्यसंमेलनात त्या कवयित्री अलका कुलकर्णी आणि रंजना शेलार ह्यांच्या अतीव आग्रहास्तव आल्या परंतु जणू निरीक्षक-परीक्षकाच्या भूमिकेत. मला अजून ते चित्र स्पष्ट आठवतेय, त्या सगळ्यात शेवटच्या रांगेतील खुर्चीत येऊन बसल्या, कुणाशी फार बोलल्या नाहीत पण त्यांची अनुभवी, प्रगल्भ नजर आम्हा सर्व पोरींची हालचाल, धडपड टिपत राहिली. तोपर्यंत माझी त्यांची ओळख नव्हती. संमेलनातही त्यांच्याशी बोलणे झाले नाही. पण नंतर “तुमच्या वॉट्सप समूहात, तुमच्या साहित्यिक कार्यक्रमांत सहभागी व्हायला आवडेल” असा त्यांचा निरोप आला. त्या समूहात आल्या आणि त्यांच्या लेखनाशिवाय इतर ठिकाणी फार न रमणाऱ्या सुमतीताई ‘साहित्यसखी’ समूहात रमल्या, समूहाची, आम्हा पोरींची अक्षरशः ‘जान’ बनल्या.
आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो आणि त्यांच्या लेखणीच्यादेखील प्रेमात पडलो.
आपण भले आणि आपले लेखन भले , कुणाशी स्पर्धा नाही की कुणाला दुखावणे नको, कुणावर रोष नाही की कसला मोह नको असे सुंदर आयुष्य त्या जगतात. त्यांना हे जे सहज जमले आहे ते आपल्यालाही जमले पाहिजे म्हणून त्यांचा हेवादेखील वाटतो.
मोजके, स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हा त्यांचा स्वभाव, फार भारंभार साहित्यिक कार्यक्रमांना न जाता निवडक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होतात. कुणालाही सढळ हाताने मदत करण्याची, आईच्या मायेने सांत्वन करण्याची , प्रेमाने समजावून सांगण्याची व समजून घेण्याची त्यांची स्वभाववैशिष्ट्ये मला भारावून टाकतात, प्रेरणा देतात.
आज सभोवतालची माणुसकी आटताना, संवेदनशीलता हरवताना , संधीसाधू, स्वार्थी वृत्तीस महापूर आलेल्या काळात सुमतीताई मला भेटल्या हे मला खूप आश्वस्त करणारं, प्रेरक आणि सुखद वाटत आलं आहे. कित्येकदा त्यांना लटक्या रागात मी म्हणतेदेखील, “तुम्ही इतके वर्षे कुठे होतात? मला इतक्या उशिराने का भेटलात?” आणि त्यावर त्या खळखळून हसत सुटतात. जिथे सारं रितं करता यावं अशी मायेची माणसं आयुष्यात असणं आज खूप गरजेचं झालंय कारण काळ निष्ठुर होतो आहे आणि निराशेचे करडे सावट मानवी आयुष्य व्यापू लागलेत ; तेव्हा धीर देणारा, उभारी देणारा एखादा चेहरा , एखादी समंजस साद आपल्या डोळ्यात लकाकी देते आणि माझ्या आयुष्यात अशी साद आहे ती सुमतीताईंची. नाशिकमध्ये कुठेही माझे व्याख्यान असो वा एकपात्री प्रयोग असो, गुडघेदुखी बाजूला ठेवून ताई स्वतःहून लेकीचे कौतुक करायला आत्मीयतेने हजर राहतात हे मला खुप विशेष वाटते तेवढेच सुखद!
कुटुंब कशा पद्धतीने मायेच्या बंधाने जोडून ठेवावे? साहित्यिक प्रतिभेचा वापर नवनिर्मितीसाठी कसा करावा? मोजका-अभ्यासू संवाद कसा साधावा? कुटुंबात संस्कार कसे रुजवावे? आदर्श कुटुंब कसे असावे? ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा. सुमती पवार आणि त्यांचे कुटुंब.
त्यांच्या प्राध्यापकीत त्यांनी अनेक उत्तम विद्यार्थी घडवलेत जे विविध क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी आहेत आणि ते विद्यार्थी आजही आपल्या गुरू पवार मॅडम ह्यांच्याप्रती कृतज्ञ आहेत. ह्याचे उदाहरण म्हणजे कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना दवाखान्यात बेड उपलब्ध होत नव्हते अशा काळात सुमतीताई व त्यांचे पती दोघेही कोव्हीडबाधित असताना अनेक गरजूंना त्यांनी मदत केली. आपल्या डॉकटर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सुमतीताईंनी दवाखाना, बेड मिळावेत यासाठी मदत मागितली व त्यांना यथाशक्ती सहकार्यही मिळाले, त्यामुळे अनेक गरजू भरती झाले व त्यांचे प्राणही वाचले. बरं ह्या कोणत्याच गोष्टींची सुमतीताईंनी कुठेच चर्चा केली नाही. कितीतरी व्यक्तींना सढळ हाताने त्या मदत करत असतात हे मी अनुभवले आहे.
मी व माझे पती कोव्हिडबाधित असताना दर तासाला त्या सतत संपर्कात होत्या. त्यांनी सतत माझी, निलुची काळजी घेतली, कधी रागावल्याही पण ते सारं प्रेमापोटी, काळजीपोटी. खरे तर त्यांच्याबद्दल काय काय लिहू? असे झालेय .
साहित्यिक म्हणून तर त्या थोर आहेतच, त्यांच्या कविता शालेय पाठयक्रमात लागलेल्या आहेत, कितीतरी कवितांची गाणी झाली आहेत . बालसाहित्यिक म्हणून महाराष्ट्रात मोठा लौकिक आहे. पण कोणत्याही मानापानास त्या भुकेल्या नाहीत, साहित्यिक राजकारणास तर त्या दुरूनच नमस्कार करतात. त्या एकटाकी कविता लिहितात , कविता लिहिताना कधीच खाडाखोड करत नाहीत. सुचली, लिहिली आणि संपली असे त्यांचे सहज सुंदर व्यक्त होणे असते. त्यांचे विचार स्पष्ट असतात, काय लिहायचे हे त्यांच्या नेणिवेत लख्ख असते तेच झरझर कागदावर येते आणि त्याचे गाणे होते. हेच सूत्र त्यांच्या जगण्यातही प्रतिबिंबित होते .
खरे तर आम्हा सर्व साहित्यसखींसाठी,
त्या ‘आनंदाचे झाड’ आहेत, ह्या झाडाच्या सावलीत आम्ही फुलतोय, खुलतोय, बोलतोय, हसतोय , रमतोय, लिहितोय आणि खूप काही चांगले शिकतोय. ज्येष्ठ कवयित्री रंजना शेलार तर त्यांना ‘कवितेची आई’ म्हणून गौरवतात आणि ते सार्थक आहे असे वाटते. अशा आनंदी, हसतमुख, निरपेक्ष , सकारात्मक, संयमी , सर्जनशील सुमतीताई म्हणजे आमच्यासाठी मौलिक ठेवा, ऊर्जा आणि प्रेरणा आहेत. हे ‘काळीजनातं’ अक्षय-अक्षर राहो बस्स….!
*- डॉ.प्रतिभा जाधव*
*लासलगाव, नाशिक*
pratibhajadhav279@gmail.com