You are currently viewing मातीत काहीवेळा बाभळीची झाडे उगवतात यात मातीचा काय दोष ???

मातीत काहीवेळा बाभळीची झाडे उगवतात यात मातीचा काय दोष ???

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐतिहासिक क्षणास राजकीय कलगीतुरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज ऐतिहासिक क्षण होता तो म्हणजे राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गच्या शिरपेचात “सिंधुदुर्ग विमानतळ” नावाचा मानाचा मुकुट घातला गेला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग विमानतळाचे आज लोकार्पण करण्यात आले. देशातील, राज्यातील दिग्गज मान्यवरांनी या अद्भुत सोहळ्यास उपस्थित राहत अवर्णनीय क्षणाचा आनंद लुटला. विमानतळ म्हणजे जिल्ह्यासाठी भूषणावह, आणि ऐतिहासिक क्षण….! परंतु या सोनेरी क्षणाला देखील सोहळ्याच्या व्यासपीठावर लक्षवेधी ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांच्यातील कलगीतुरा..
खासदार विनायक राऊत यांनी सूत्रसंचालन करताना सर्वांचेच आदराने स्वागत केले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्री सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या पायगुणामुळे विमानतळ पूर्णत्वास जात लोकार्पण होत असल्याचे सांगून पायगुण म्हणत रेशमी चिमटा काढला होता. त्यानंतर केंद्रीयमंत्री तथा माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल गौरवोद्गार काढत भाषणाच्या ओघात सरकारवर शेलक्या शब्दात टीका करत गरळ ओकण्यास सुरुवात केली. आपण मुख्यमंत्री असताना भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी विमानतळास काहींनी विरोध केला होता, सी वर्ल्ड प्रकल्पास देखील विरोध केला होता, ते कोण आहेत? आज ते व्यासपीठावर उपस्थित आहेत अशी कोणाचे नाव न घेता गंभीर आरोप केले. तसेच विमानतळ लोकार्पण करता परंतु आजूबाजूच्या रस्त्यासाठी 32 कोटी देत नाहीत, विमानाने येणारे खड्ड्यातून जाणार का? असा प्रश्न उद्घाटन सोहळ्यास उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. उद्धव ठाकरेंनी भाषणाला उभे राहतात राणेंच्या प्रश्नाला त्याच भाषेत उंच टोलावत षटकार मारला. आजचा क्षण हा आनंदाचा क्षण आहे, आदळ आपट करण्याचा नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी चांगलं करताना काळा टीका हा लागतोच असे मिश्किल उत्तर दिले.
नारायण राणेंच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “नारायणराव तुम्ही विकासकामे केलात यात तुमचं नक्कीच योगदान आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु कोकणची जनता डोळे मिटून राहत नाही. शांत,संयमी जनता सदासर्वदा भयभीत होऊन काहीही करेल असं नाही. ती मर्द आहे, दोन वेळा त्यांनी खासदार विनायक राऊत सारखा हक्काचा माणूस निवडून दिला आहे. म्हणून मला खासदार विनायक राऊत यांचा अभिमान आहे असे ठणकावून सांगत आपल्या सहकाऱ्याची पाठ थोपटताना, कोकणी जनतेनेही ऋण व्यक्त करत नारायण राणेंना त्यांचा आणि त्यांच्या माजी खासदार मुलाचा पराभव केल्याची आठवण करून दिली.
नारायण राणे यांनी बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती, ते त्यांना कधीच जवळ करत नव्हते, त्यांनी १९९० साली आपल्याला कोकणात पाठवले व नारायण कोकण तुला बोलावतय असे सांगितल्याची आठवण सांगतानाच उद्धव ठाकरेंनी आपले सहकारी जिल्ह्यात काय करतात ते एखादी व्यक्ती नेमून माहिती करून घ्या, तुमचे सहकारी खोटं बोलतात अशी सरळ सरळ तक्रारच केली. उद्भवजींनी मात्र नारायण राणे यांचाच विषय उचलून धरताना, “होय, बाळासाहेबांना खोटं आवडत नव्हतं, म्हणून तर त्यांनी अशा लोकांना तेव्हाच पक्षातून काढून टाकलं होतं हा सुद्धा इतिहास आहे” अशी कोपरखळी करत राणेंवरच पलटवार केला.
मुंबईहून येताना विमानात राऊत यांनी आपल्याला पेढा दिला तेव्हा त्या पेढ्याचा छोटासा तुकडा आपण घेतला व राऊतांना पेढ्यातील गोडवा अंगी बाळगा असा सल्ला दिल्याचे नारायण राणे सांगितले होते. उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना “आपण विकासात कोतेपणा आणत नाही, तुमच्या कॉलेजच्या परवानगीसाठी फोन केलात तेव्हा दुसऱ्याच क्षणाला आपण सही केल्याचीही आठवण राणेंना करून देत, पेढ्यातील गोडवा अंगी बाळगावा लागतो म्हणून तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला, असे म्हणतात.” आपल्याला बोलायचं नव्हतं कारण आजचा कार्यक्रम कोकणासाठी महत्वाचा आहे, परंतु बोलावं लागलं असे सांगत विकासासाठी एकत्र येऊन काम करू असेही सांगितले.
नारायण राणेंनी केवळ आपण असतानाच बाळासाहेबांच्या प्रेरणेने कोकणचा विकास केला, कोणी क्रेडिट दिले नसले तरी कोकणच्या जनतेला ज्ञात आहे. पाण्याची कमी पूर्ण करण्यासाठी धरणे मंजूर करून कामे सुरू केली परंतु त्यानंतर धरणासाठी देखील एक नवा पैसा खर्च झाला नसल्याचे सांगितले होते. विमानतळावर देखील पाणी नाही असेही म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलताना “उद्या सिंधुदुर्ग किल्ला देखील मीच बांधला होता असेही कोणीतरी म्हणेल” असा नारायण राणेंचे नाव न घेता टोला लगावला. नारायण राणे यांना उद्देशून बोलताना केंद्रीय मंत्रिपद मिळणे हे भाग्याचे आहे, त्यासाठी नशीब लागतं, तुम्हाला सूक्ष्म असो किंवा लघु, मोठं खाते मिळाले आहे, त्या संधीचे सोने करू माती करू नका” असाही सल्ला दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे पहिल्यांदाच जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर येणार म्हटल्यावर नक्कीच काहीतरी घडणार याची सर्वानाच खात्री होती. खासदार राऊत सूत्रसंचालन करताना पाहून राणेंनी विमानतळाचे मालक बदलले की काय? असा प्रश्न म्हैसकर यांना करत जुगलबंदीला सुरुवात केली होती, त्याला उद्धव ठाकरेंनी ठाकरे शैलीतच उत्तर देत राजकीय धुरळाचं उडवून देत बाजी मारली. देश, राज्यातील दिग्गज नेत्यांची हजेरी आणि राजकीय जुगलबंदीची शक्यता असल्याने विमानतळावर कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा