काँग्रेसने लखमपूर खिरी प्रकरणी राजकीय ढोंगीपणा थांबवावा – भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर
प्रेतांवर राजकारण करण्याची काँग्रेसची सवय जाता जाणार नाही. लखमपुर खिरी प्रकरणातील सत्य निश्चितच उघडकीला येईल, पण तोवर थांबण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. त्याआधीच त्यांना आपले घाणेरडे राजकारण साधून घ्यायचे आहे. शेतकऱ्यांच्या नावाने ढोल पिटत राजकीय स्वार्थ साधण्याची काँग्रेसची वृत्ती अतिशय घृणास्पद असल्याची टीका भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी केली आहे.
कोणतेही सत्य समोर येण्यापूर्वीच काँग्रेस योगी व मोदी सरकारवर शेतकरी नरसंहारासारखे आरोप करत आहेत. शेतकऱ्यांबद्दलचे त्यांचे प्रेम ९ ऑगस्ट २०११ च्या मावळच्या गोळीबाराच्या वेळी कुठे गेले होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते ना? महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांचाही बळी घेणारे हे काँग्रेसवाले उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवर खोटेपणाचे राजकारण करत आहेत.
लष्कर ए तोयबासारखे अतिरेकी काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडवण्यासाठी हिंदू व्यापाऱ्यांचा बळी घेत आहेत. त्यावर बोलायची हिंमत काँग्रेसचे नेते राहुल आणि प्रियांका गांधी करताना दिसत नाहीत, मात्र शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या शक्ती त्यांना जवळच्या वाटतात. काँग्रेसची ही देशविघातक भूमिका योग्य नव्हे. आपल्या या घातक अजेंड्यासाठी मोदी आणि योगींची बदनामी करण्याचे त्यांचे घातक षडयंत्र जनताच हाणून पाडेल, असे अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.