जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई यांचा अप्रतिम लेख
ऐका हो ऐका…एक आटपाट नगर होतं. तिथे एक मध्यमवर्गीय दांपत्य राहत होतं. मुलाबाळांनी भरलेलं घर… खाऊन पिऊन सुखी…आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती…असा त्यांचा संसार… मुलं मोठी झाली…त्यांची लग्नकार्य झाली आणि त्यांनाही मुलं झाली…मोठ्या मुलाला दोन मुलगे…मधल्या मुलालाही दोन मुलगे आणि धाकट्या मुलाला एक मुलगा…घराचं अगदी गोकुळ झालं होतं…पण…….
आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं छान असताना हा पण कुठे आला मध्येच…
तीच तर गंमत आहे मंडळी…आता ती दोघं आजी-आजोबा झाली होती नं…! प्रत्येक वेळेला पहिला नातु झाला की दुसर्या वेळेला तरी आपल्याला नात व्हावी अशी त्या दोघांची इच्छा होती. पण दोन्ही मुलांकडे कांही ही इच्छा पूर्ण झाली नाही. पण धाकट्या मुलाला पहिला मुलगा झाला तेव्हा सगळेजण आनंदित झाले तरी हे मात्र जरा नाराजच…आता हे काय कोणाच्या हातात असतं…पण म्हणतात ना कळतंय पण…आणि ह्यांची इच्छा जरा जगावेगळीच नाही का…बरं त्यांना स्वतःला मुली नव्हत्या असंही नाही…असो…
अखेर धाकट्या सुनबाईला पुन्हा दुसऱ्या वेळा दिवस राहिले (हो…तेव्हा ‘हम दो हमारा एक’ असंच काही नव्हतं बरं… म्हणुन) तर…मग मात्र हे आपले सारखे सुनबाईला बजावत रहायचे आता मात्र नातच हवी हो सुनबाई….तीही आपली गमतीने तथास्तु असं म्हणत असे.
यथावकाश योग्यवेळी ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि थोड्याशा प्रतीक्षेनंतर आजी-आजोबांना हवी ती बातमी मिळाली… मुलगी झाली मग काय विचारता महाराजा…ह्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अर्ध्या रात्री त्यांनी आपल्या लेकीला फोन केला. ती बिचारी घाबरली…घाबरणार नाही तर काय! असा अर्ध्या रात्री कोणाचा फोन येणे म्हणजे…! बरं…तेव्हा सगळा लॅंडलाईनचा कारभार…कोणाचा फोन आहे कळायला मार्ग नाही…तिने भीतभीतच हॅलो म्हटलं…आणि तिकडुन ह्यांचा आनंदाने ओथंबून भरलेला स्वर…”अखेर मुलगी झाली हो…तुमच्या नंतर घराला पुन्हा एकदा माहेरवाशीण लाभली.”
मंडळी…ज्या वेळेला मुलगी अगदी नकोशी होती…तिचा जन्म म्हणजे घरात नाराजीचं वातावरण निर्माण होत होतं…स्त्रीभ्रूणहत्या अगदी सर्रास झाल्या होत्या…मुलगाच हवा या अट्टाहासामुळे स्त्रीला एखाद्या यंत्राप्रमाणे कितीही मुलींना जन्माला घालावे लागत होते आणि त्यानंतर एक मुलगा झाल्यावरही पुन्हा एकाच्या जोडीला दुसरा हवाच असाही आग्रह करत असत…या कारणामुळे क्वचित सुनेला कायमचं माहेरी पाठवुन मुलाचं दुसरं लग्नही करून दिल्या जात होतं… (‘मुलगा हवाच’ या हट्टाची कारणं काहीही असोत…तो एक वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल)
त्यावेळची म्हणजे पंधरा-वीस वर्षांपूर्वीची कहाणी आहे ही…दोन्ही मुलंच असणे म्हणजे एकाला दुसरा भाऊ बरा… किंवा राम-भरत / लव-कुश ह्यांची जोडी असं मानण्याचा तो काळ…पण अशा या दिवसांत जुन्या काळातले हे आजी-आजोबा घरात एखादी तरी मुलगी जन्माला यावी म्हणून मुलीची आतुरतेने प्रतीक्षा करतात आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नाही ही नवलाची गोष्ट नव्हे काय!
पण त्यामुळेच जनजागृती करण्यासाठी मुलगी झाली हो हे पथनाट्य ज्यावेळी खुपच गाजत होतं…
त्यावेळी ह्यांच्या घरात आगळ्यावेगळ्या सकारात्मक अर्थाने कन्या जन्माचा जागर होत होता…
मुलगी झाली हो…
सौ. भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334