You are currently viewing प्रविणकुमार ठाकरे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

प्रविणकुमार ठाकरे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा
पुरस्कार प्रदान

सावंतवाडी

सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने कोविड १९ प्रतिबंध व उपययोजनाबाबत गेली दिड वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व कृतज्ञतापत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलास देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या
सामाजिक संस्था विभाग आणि शासकीय व्यक्ती अधिकारी विभागातून व्यक्ति, संस्था व अधिकारी अशा एकूण ३० जणांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

मार्च २०२० पासून आपल्या देशात कोरोनाने थैमान घातले. यावेळी अनेक संस्था, व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी यांनी पर्वा न करता जमेल तसा कोरोनाविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला. अशा कोरोना योध्यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र, द्वारे राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गणेश देशमुख (महापालिका आयुक्त – पनवेल ), डॉ. राजेंद्र भारूड (माजी जिल्हाधिकारी,नंदुरबार ) मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी सोलापूर), अमितेश कुमार (पोलीस आयुक्त,नागपूर), डॉ. प्रदीप आवटे ( राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी), डॉ. राजेश देशमुख (जिल्हाधिकारी, पुणे), या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोविड योद्धा सन्मानाने गौरविण्यात आले.

तसेच वैयक्तिक पुरस्कार टास्क फोर्स चे सदस्य पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, कॉकटेल लसीचा ग्रामीण भागात प्रथमतः प्रयोग करणारे बार्शी येथील डॉ. संजय अंधारे, टेलिमेडिसीन द्वारे हजारो लोकांना कोविड काळात मार्गदर्शन करणारे डॉ. गौतम छाजेड – पुणे, शेकडो लोकांना अन्नदान करणारे वर्धा येथील डॉ. मुन्नालाल गुप्ता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – नागपूर येथे स्वखर्चाने ऑक्सीजन प्लांट उभारून देणारे प्यारे खान, लोक कलेद्वारे कोरना रुग्णांचे मनोरंजन करणारे परभणी येथील मधुकर कांबळे तसेच ठाणे येथील मंगेश चिवटे यांनादेखील यावेळी कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

पूर्वीपासून ज्या संस्था समाजहिताचे कार्य करीत आहेतच,परंतु कोविड काळात देखील ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे समाजासाठी कार्य केले, अशा संस्थांच्या प्रतिनिधींना यावेळी विशेष राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात केतनभाई शहा ( भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र), सोनू डागवाले (दिशा प्रतिष्ठान, लातूर), रौफ पटेल (वजीर रेस्क्यू फॉर्स, शिरोळ, जिल्हा कोल्हापूर), धारावीत विशेष कार्य करणाऱ्या सेवांकुर मुंबईचे डॉ. नितीन गायकवाड, मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणे चे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, मातृभूमी प्रतिष्ठान बार्शीचे संतोष ठोंबरे तसेच सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांचादेखील, त्यांनी राबविलेल्या अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने आजवर १७ गावात निशुल्क आरोग्य शिबिरे आयोजित केली. हजारो विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार केले. शेकडो विद्यार्थ्यांना छत्री वाटप तसेच स्कूल किट वाटप प्रतिष्ठान द्वारे करण्यात आले.
याशिवाय सावंतवाडी ते कोल्हापूर अशी “लेक वाचवा लेक शिकवा” पदयात्रा करण्यात आली. ही पदयात्रा ४० गावे, ३ नगरपालिका व १ महानगरपालिका भागात जाऊन जनजागरण करण्यात आले, यात दहा हजार पेक्षा जास्त लोकांचा समावेश होता. प्रतिष्ठान द्वारे एमपीएससी व यूपीएससी बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्यात. अनेक गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण आर्थिक सहकार्य देण्यात आले. राष्ट्रीय स्विप कार्यक्रमात सहभागी होऊन निवडणूक आयोगास मदत करण्यात आली. लहान मुले / पालक वर्ग यांच्यासाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आल्यात. शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी देखील अशा पद्धतीचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शालेय वाचनालयाचा “शब्दगंध” उपक्रम जिल्ह्यातील १८ शाळांमध्ये चालवल्या जात आहेत. प्रतिष्ठानद्वारे शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन विगत ५ वर्षांपासून करण्यात येते. जिल्हा कारागृहामध्ये देखील अनेक प्रकारचे उपक्रम आजवर प्रतिष्ठान द्वारे राबविण्यात आलेले आहे.
प्रतिष्ठान द्वारे डॉ. डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्र चालविल्या जाते. ज्यात अल्पशा अनामत रक्कमेवर वॉकर, व्हील चेअर, कमोड चेअर, फाऊलर बेड इत्यादी साहित्य ठराविक कालावधीसाठी वापरण्याकरीता देण्यात येते. साहित्य परत आल्यावर अनामत रक्कम परत केल्या जाते. यासाठी कुठलेही भाडे आकारले जात नाही. याशिवाय प्रतिष्ठान द्वारे या केंद्रात शीतशव पेटीका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विविध संस्थांच्या सेवाकार्यात प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सतत सहभागी होत असतात. नगरपालिकेची स्वच्छता मोहीम असुदेत किंवा इतर संस्थांनी आयोजित केलेले आरोग्य शिबिरे असू दे, यात संस्थेचे कार्यकर्ते हिरिरीने सहभागी होतात.

कोरोना काळात प्रतिष्ठान द्वारे सरमळे – शितपवाडी, ओटवणे येथे निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. याशिवाय सावंतवाडी नगरातील भाजीच्या दुकानाकरिता सुरक्षित शारीरिक अंतरासाठी पांढरे चौकोन आखून दिलेत. सुरवातीच्या काळात प्रतिष्ठान द्वारे २०० कापडी मास्क चे वाटप करण्यात आले. हे मास्क शहरातील वीज मंडळ कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी, पोलीस इत्यादींना देण्यात आले. हे मास्क महिला बचत गटांकडे बनविण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देखील प्रतिष्ठानद्वारे सहयोग राशी पाठविण्यात आली.

शासनाने कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नाभिक बांधवांना दुकाने उघडण्याची परवानगी दिली. अशावेळी त्यांच्या व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील १६० नाभीक बांधवांना “कोरोना सुरक्षा किट ” प्रदान करण्यात आली. शिवाय कोविड -१९ संबंधी नियमावलीचे स्टिकर्स देखील देण्यात आले. अशाच प्रकारचे किट सावंतवाडी शहरातील चर्मकार बांधव व टू व्हीलर मेकॅनिक यांना देखील देण्यात आलेत.
कोरोना महाभारीत समाजमन ताण-तणाव, नैराश्य, भीती, असुरक्षितता अशा समस्यांनी ग्रसित होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी च्या सहकार्याने “ताण तणाव कारणे व उपाय”, ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे ६० गावात कोविड बाबत जागृती निर्माण करणारे फलक लावण्यात आलेत.
अशाप्रकारे संस्थेने विविध अभिनव उपक्रम राबविल्यामुळे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवडण्यात येऊन, तो प्रदान करण्यात आला.

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांना यावेळी त्यांच्या अभिनव सेवाभावी उपक्रमांसाठी विशेषत्वाने गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास नामदार श्री राजेश टोपे (मंत्री, आरोग्य विभाग, महाराष्ट्र) व नामदार श्री अमित विलासराव देशमुख (मंत्री, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र) हे उपस्थित होते व त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मंचावर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने, उपाध्यक्ष श्री तुळशीदास भोईटे व सचिव नंदकुमार सुतार उपस्थित होते.
सर्व कोरोना योद्ध्यांचा उल्लेख तसेच कोरोना काळात समाज कसा जागृत होता, शासनास कसे सहकार्य करीत होता, व्यक्ती – प्रशासन – शासन – संस्था त्यांच्या त्यांच्या स्तरावर कसे झटलेत व त्यांच्या कार्याचा उल्लेख नामदार राजेश टोपे व नामदार अमित देशमुख यांनी करून सर्व पुरस्कार प्राप्त योध्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजा माने यांनी केले. आभार संघटनेचे उपाध्यक्ष श्री तुळशीदास भोईटे यांनी व्यक्त केले. या समारंभास प्रतिष्ठानचे सचिव भार्गवराम शिरोडकर व सहसचिव अँड्र्यू फर्नांडिस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा