*संवाद आटणे..*
सृष्टीचा समाजप्रिय बुद्धिमान प्राणी *मानव..* अनं मानवी जीवनामध्ये संवादाला खूप महत्वाचे स्थान आहे हे विसरून चालणार नाही..
मागच्या वर्षातील एक प्रसंग आठवला.. कोरोनाचा कहर जगभर पसरला होता.. कोणी कोणाकडे जातं येतं नव्हते.. अगदी प्रियजनाच्या मयतीला सुद्धा.. हाक मारायला पण जायची भीती वाटत होती.. होता तो *फक्त दुरून संवाद..* तेंव्हा संवादाचे खरे महत्व पटले.. पण समाधान नव्हते.. कारण *प्रत्यक्ष भेटी विना संवाद म्हणजे अगदी अळणी..*
संवाद अनेक प्रकारचे असतात..
*आत्म संवाद* – प्रत्येक व्यक्ती दर क्षणाला स्वत:शी एक संवाद साधत असते, म्हणजे प्रत्येक क्षणी त्या-त्या प्रसंगानुसार आपल्या मनात विचार येत असतात.. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील होते..
*द्वीव्यक्ती संवाद* – दोन व्यक्तींमधील संवाद यात सहसा तिसरा व्यक्ती सामील नसतो.. या संवादात तात्काळ प्रतिसादही मिळतो व व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो..
*समूह संवाद* – जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, ह्यांत चर्चा, वादविवाद, समुपदेशाची देवान घेवाण होते..
*जनसंवाद* – यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो.. त्यामुळे प्रतिक्रिया उशिराने होते..
*एकमेकांशी बोलणे* हा संवाद या शब्दाचा अर्थ होतो.. अश्या संवादाद्वारे आपण आपल्या मनातील विचार व भावना व्यक्त करू शकतो.. संवादातून बोलणाऱ्याची व ऐकणाऱ्याची भाषा, अनुभव, मानसिक परिस्थिती, भावनिक संतुलन यावर ऐकलेल्या शब्दाचं आकलन होत असतं.
आजच्या संघनकाच्या युगात एकत्र कुटुंबपद्धती लयास गेली आहे.. राजा-राणीच्या संसाराच्या स्वप्नामुळे विभक्त कुटूंब पद्धत उदयास आली.. मुले लहानपणापासुन आई-बाबापासून लांब पाळणाघरात असतात.. संध्याकाळी पालकांशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर ‘ दमलो आहोत.. त्रास देऊ नको.. TV बघा ‘ अशी उत्तरे देऊन संवाद संपतो..
अनेक वेळा पालक ऑफिसमधून उशीरा परतल्यामुळे मुले वाट पाहून झोपी गेलेली असतात.. इथेही संवाद साधला जातं नाही..
हायस्कुलची मुले शाळा, ट्युशन, प्रकल्प ह्यांत इतकी गुरफटलेली असतात की पालकांशी व नातलगांशी संवाद साधू शकत नाही.. इथेही संवाद तोकडा पडतोय..
अनं दीड वर्षापासुन कोरोनामुळे तर शाळा, मैदानी खेळ, सहली, स्नेहसंमेलन, लग्नकार्य, बारसे, वाढदिवस, मयत, मंगळागौर, सणवार, उत्सव… अडचणीत मदतीला धावून जाणे, आनंदात गळाभेटी, दुःखात सांत्वना भेटी… अश्या सर्व गोष्टीवर बंधने आली.. नाईलाजाने प्रत्यक्ष भेटीचा संपर्क तुटला.. मग फक्त दुरून संवाद व कृती राहिली.. सोशल मीडियावर शुभेच्छा व सांत्वना देऊन संवाद न करता विषय संपू लागला..
याही पुढे जाऊन ऑनलाईन लग्न जुळवून.. वेगवेगळ्या देशात राहून वर वधू .. ऑनलाईन आभासी संवाद साधून लग्न ही होऊ लागली..
ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे ज्या लहानमुलांना आत्तापर्यंत मोबाईलपासून दूर ठेवले जात होते.. त्यांना संघनक, लॅपटॉप, स्मार्टफोन अभ्यासासाठी देण्यात आले.. पण अभ्यासाव्यतिरिक्त ही मुले ऑनलाइन विविध गेम खेळू लागली.. अशाप्रकारे एकलकोंडी झालेली ही मुले संवादापासून दूर झाली.. अनेक मुले हा कोंडमारा सहन न झाल्यामुळे आत्महत्या करु लागली..
अश्याप्रकारे संवाद आटत गेला.. कामाच्या स्पर्धेत हरवलेले आई-बाबा, नात्यामध्ये जिव्हाळ्यापेक्षा एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा आणि सोशल मीडियावर लाइक्सच्या मागे लागलेली तरुणाई, यामुळे अनेक घरांमधील *संवादाची जागा विसंवादाने घेतली* आहे.. यामुळेच या गोड नात्यामध्ये चिडचीड, अंहकार, हेवेदावे, मतभिन्नता वाढत गेली..
नातलग व नाते ह्यातील गोडवा.. आई-बाबा आणि मुलांच्या नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी *संवाद हे एकच रामबाण औषध आहे.. आणि तो संवाद सर्वांनी साधालाच पाहिजे..*
🙏🙏🙏🙏
निबंधा देशमुख