मालवण :
भरधाव वेगाने आलेल्या कारने तिघा पादचाऱ्यांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री उशिरा आचरा मालवण मार्गावर आचरा हायस्कूल समोर घडली. दुर्घटनेत उपनिरीक्षकाची मुलगी जखमी झाली आहे.
अपघातात मृत झालेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव दीपक पुरुषोत्तम लोणे (वय- ४७, सध्या रा. आचरा वरचीवाडी) असून ते पालघर जिल्ह्यात सेवेत आहेत. त्यांच्यासह जमेंदर प्रसाद (वय ५०, रा. आचरा वरचीवाडी) यांचाही कणकवली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपनिरीक्षक लोणे हे सुट्टीवर आचरा येथे आले होते. आपली मुलगी परी (वय १७) व सहकारी जमेंदर प्रसाद यांच्यासोबत रविवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करून चालत घरी निघाले होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या कारने तिघांना धडक दिली. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघाही जखमींना ग्रामस्थ व पोलिस यांनी आचरा येथे प्राथमिक उपचारानंतर कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान दीपक लोणे व जमेंदर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या अपघात प्रकरणी कार चालक कृष्णा राणे (वय ६०, रा जानवली, कणकवली) याच्या विरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक देणारी कार व कार चालक यांना आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.