वैभववाडी
आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख सहा. प्रा. एस. एन.पाटील व मानसशास्त्र विभागाचे सहा. प्रा. आर. एम. गुलदे लाभले. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने केला. दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सर्व उपस्थितांना महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्वावर आधारित जागतिक अहिंसा शपथ देण्यात आली. याप्रसंगी कुमारी रिया जाधव व रुचिता दळवी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन अशा थोर नेत्यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा असे उपस्थितांना आवाहन केले .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सहा. प्रा.आर एम गुलदे यांनी स्वातंत्र्यप्राप्ती बरोबरच वांशिक भेदभाव वर्णभेद व जात धर्म यावर आधारित भेदभाव याविरुद्ध महात्मा गांधी यांनी भारतासह दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा अहिंसेच्या मार्गाने प्रखर लढा दिल्याचे स्पष्ट केले. सहा. प्रा.एस. एन.पाटील यांनी देशाचा पोशिंदा शेतकरी व देशाचा संरक्षक जवान हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहेत हे ओळखून लालबहादूर शास्त्री हे जय जवान, जय किसान चा नारा देणारे खरे द्रष्टे नेते होते असे प्रतिपादन केले. महात्मा गांधींनी स्वातंत्र प्राप्ती साठी सत्याग्रह, अहिंसा, असहकार व सविनय कायदेभंग यासारख्या सनदशीर मार्गांचा प्रभावी साधन म्हणून वापर करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे अहिंसा हे तत्व संपूर्ण जगाने स्वीकारले असून आज संपूर्ण जगभर अवलंब होत आहे. त्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा होत आहे हे संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असेही त्यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी महात्मा गांधींच्या तत्वांचा प्रत्येक भारतीयाने अवलंब केल्यास आपला देश जगात आदर्शवत ठरेल असे प्रतिपादन केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एम आय कुंभार यांनी अशा कार्यक्रमांमधून थोर पुरुषांचे विचार, जीवन मूल्य, कार्यकर्तृत्व, देशाच्या जडणघडणीतील योगदान महाविद्यालयीन युवा पिढीमध्ये रुजविण्याचे कार्य सांस्कृतिक विभागामार्फत सातत्याने केले जात आहे. कोरोनाच्या जागतिक महामारी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता यावे यासाठी हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या यूट्यूब चैनल वर ऑनलाइन पद्धतीनेही सादर करण्यात आला आहे असे सांगितले.या कार्यक्रमाचे आभार सहा. प्रा. एस एस भास्कर यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य ए.एम. कांबळे, कार्यालयीन अधिक्षक श्री. संजय रावराणे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.बी डी इंगवले अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे समन्वयक डॉ.डी. एम. शिरसट उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. सौ. एस. एस. पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.