वेंगुर्ला उपनगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला
वेंगुर्ले
सध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ला उपनगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबतचे आदेश नोटीसीद्वारे दिले आहेत. त्यामुळे आता उर्वरित अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी या खुर्चीवर कोणाची वर्णी लागते याकडे वेंगुर्ले शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत.
वेंगुर्ले येथील मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या त्या १५ गाळेधारकांवर नुतन सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळे देताना अन्याय झाला. असा आरोप करत अस्मिता राऊळ यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा २६ ऑगस्ट रोजी दिला होता. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी राजीनामा मंजूर केला होता. दरम्यान या रिक्त उपनगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे विशेष सभा घेण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी हे या सभेचे अध्यक्षपद भूषावतील. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने स्वतः मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर करावे. यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येईल. जास्त उमेदवार असतील तर मतदान होऊन पीठासीन अधिकाऱ्यामार्फत निकाल जाहीर केला जाईल. असा उपनगराध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.