अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी
वैभववाडी
वैभववाडी – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. करूळ जामदारवाडी ते घाटपायथा दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून चालणेही मुश्कील बनले आहे. या मार्गावरून जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मोठ्या खड्यामुळे वाहने मार्गात अडकुन पडण्याच्या घटना घडत आहेत.
रस्ता दुरवस्थेमुळे अपघाताची मालिका तर मार्गावर सुरूच आहे. करूळ घाटात अनेक ठिकाणी वळणावर खड्डे असल्याने वाहने फसत आहेत. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडीचा सामना अनेकदा वाहनचालकांना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची वाताहत झाली आहे. करूळ जामदारवाडी बस स्टॉप नजीक विहिरीच्या आकाराचा खड्डा पडला आहे. तसेच पुलावरती ही मोठा खड्डा पडला आहे. या खड्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ब्रीजला धोका उद्भवू शकतो. या मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराने भरण्यात यावे. तसेच धोकादायक बनलेल्या पुलाची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांमधून केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून या महामार्गाची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग व गोवा राज्यात येणारे पर्यटक हे सर्रास याच मार्गावरून प्रवास करतात. तसेच अवजड वाहतूकही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घाटमार्गकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी हानी पोहोचणार आहे.