You are currently viewing बांदा स्मशानभूमी परिसरात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य…

बांदा स्मशानभूमी परिसरात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य…

शिवसेना आक्रमक; चार दिवसात स्वच्छता करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा…

बांदा

बांदा स्मशानभूमीत ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी येणाऱ्या डांबरी रस्त्यावर देखील कचरा टाकण्यात आल्याने स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी येणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या ४ दिवसात स्मशानभूमी परिसर दुर्गंधीमुक्त करावा अन्यथा मंगळवार दिनांक ५ रोजी याठिकाणी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा बांदा शहर शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अक्रम खान यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सरपंच खान यांनी बांदा शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी जागा निश्चिती करण्याची प्रक्रिया शासन पातळीवर सुरू असल्याचे सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव बांदा ग्रामपंचायतसाठी कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ‘गोवर्धन’ प्रकल्प मंजूर झाल्याची माहिती दिली. ५० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे खान यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे.
पाऊस ओसरल्यानंतर येत्या ४ दिवसात जेसीबीच्या साहाय्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन सरपंच खान यांनी दिले. तसेच कचरा रस्त्यावर येऊ नये किंवा अन्य ठिकाणांहून कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी भविष्यात स्मशानभूमी परिसरात दगडी कुंपण घालण्यात येणार असल्याची माहिती खान यांनी दिली. यावेळी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर, भाऊ वाळके, सुशांत पांगम, भैय्या गोवेकर, सुनील नाटेकर, ओंकार नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके, निखिल मयेकर, ज्ञानेश्वर येडवे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा