भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांचा शिवसेनेवर निशाणा
घेराव आणि मोर्चाच्या वेळी महावितरणचे गोडबोले अधिकारी मागण्याबाबत तोंडावर होय म्हणतात. पण, पाठीमागुन हाताखालच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोज पंचवीस जणांकडे जाऊन त्यांचे बिल वसूल करण्याची किंवा लाईट तोडण्याची सक्ती करतात. यात लोकांच्या संतापाची शिकार स्थानिक कंत्राटी कर्मचारी होत आहेत. अधिकारी मात्र कोंबड्या झुंजवण्याचा खेळ खेळत मजा बघत आहेत.
आठवडाभरात साडेतीन कोटींची वसुली करायचे टार्गेट ठेवून महावितरण काम करत आहे. मात्र सामान्य माणसांच्या मीटरपर्यन्तच यांची कुवत असते. जिल्ह्यातील नेत्यांची थकबाकी नसेल तर वीजवितरणने तसे जाहीर करावे, असे आव्हान भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांनी दिले आहे. शिवशाहीच्या नावावर सामान्य जनतेला नाडणारी मोगलाई चालली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
या सगळ्या मीटर-तोडणी नाट्यात पालकमंत्री उदय सामंत “मौनम् सर्वार्थ साधनम्” करत मौनीबाबा बनून डाव साधून घेत आहेत. जनतेबरोबर आहोत हे तोंडदेखले दाखवण्यासाठी शिवसेनेची वीज कार्यालयातली सगळी स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर पालकमंत्र्यांनी या विषयावर जनतेच्या बाजूने ठाम उभे राहुन बोलावे. शिवसेनेच्या कोणत्याही गटाच्या गटबाजीतून त्यांच्या सोबत कोण राहणार नसेल, तर आम्ही त्यांच्यासोबत राहू असे अविनाश पराडकर म्हणाले आहेत
चतुर्थीच्या काळात कोणाचीही वीजबिल तोडली जाणार नाही असे पालकमंत्री म्हणाले होते. पालकमंत्र्यांचे वक्तव्य हा आदेशच असतो. असे असताना पालकमंत्र्यांचे आदेश वीजवितरणचे अधिकारी धाब्यावर बसवणार असतील, तर एक तर पालकमंत्री कमी पडतात किंवा हे अधिकारी पालकमंत्र्यांच्या वरताण आहेत. यातली नेमकी वस्तुस्थिती शिवसेनेने स्पष्ट करावी. सत्तेत असताना विरोधाची स्टंटबाजी करत सगळीकडेच “शो-सेना” होण्याचा प्रसिद्धीचा हव्यास कशाला, तुमच्या भावनांची कदर मुख्यमंत्र्यांना राहिलेली नाही का, असा परखड सवालही त्यांनी विचारला आहे.