‘त्यांचा’पगार चार दिवसात मिळणार – सुरक्षारक्षकांनी मानले अमित इब्रामपूरकर यांचे आभार
शासकीय तंत्रनिकेतन मधील सुरक्षारक्षक मानधनाअभावी वाऱ्यावर असल्याची बातमी प्रसिद्ध होताच मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथे धाव घेत प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय एस चोपडे यांची भेट घेत सुरक्षा रक्षकांच्या थकित मानधनाविषयी चर्चा केली.यावेळी चर्चेदरम्यान प्राचार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरक्षा रक्षकांचे देय असलेली ४,०१,६६६/- रक्कम चार दिवसात संबंधितांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे स्पष्ट केले.पालकमंत्री व उच्च शिक्षण मंत्री तसेच अन्य सत्ताधार्यांचे याप्रश्नी लक्ष वेधण्यात आले होते. तंत्रशिक्षण खाते असलेल्या मंत्र्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही परंतु विरोधी पक्ष असलेल्या मनसे पक्षाने दखल घेतली याबद्दल सुरक्षा रक्षक संजय गावडे,संजय देवूलकर,शिवदास परब,दिगंबर यादव,महेश सुर्वे यांनी अमित इब्रामपूरकर यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहीती अशी की,आपल्या थकित वेतना संदर्भात तंत्रनिकेतन येथे कार्यरत असलेल्या सात सुरक्षारक्षकांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.परंतु या पक्षाच्या लोकप्रतिनीधींनी निराशा केली. सुरक्षारक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली सदर बातमी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध होताच मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी तंत्रनिकेतन येथे धाव घेत ‘त्या’ सुरक्षारक्षकांशी चर्चा केली.प्राचार्य सुरेश पाटील बाहेरगावी असल्याने प्रभारी प्राचार्य पदभार सांभाळणारे डॉ.संजय चोपडे कॉलेजला सुट्टी असल्याने उपस्थित नव्हते.यावेळी इब्रामपूरकर यांनी दूरध्वनीवर संपर्क साधत त्यांना तात्काळ कॉलेजमध्ये येण्यास सांगितले.
प्राचार्य डॉ.संजय चोपडे व मनसेचे अमित इब्रामपूरकर यांच्याशी चर्चा सुरू असताना ड्युटीवर असलेल्या चार सुरक्षारक्षकांनी आपली बाजू मांडताना गेले १२ वर्ष आम्ही नियमितपणे तंत्रनिकेतनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहोत.कोव्हीड काळात सुद्धा जीवावर उदार होऊन सेवा दिली परंतु आता मानधनाऐवजी परवड होत असल्याचे सांगितले.गणेशोत्सव कर्ज काढून साजरा केल्याचे सांगितले.
इब्रामपूरकर यांनी पाचपैकी दोन महिन्याचा पगार काल रात्री सुरक्षारक्षकांच्या खात्यात जमा झाला असुन उर्वरित तीन महिन्यांची बीले केव्हा अदा करणार? असा सवाल केला.यावेळी एप्रिल,मे कालावधीतील सुरक्षा रक्षकांच्या बीलात बील नंबर व बीलाची तारीख नसल्याने सदर बीलावर आक्षेप असल्याने दोन महिन्याचा पगार कॉलेज प्रशासनाकडून कडून स्थगित ठेवला असल्याचे प्राचार्यांच्या निदर्शनास आणले. यावर प्राचार्यांनी उत्तर देताना निधीसाठी तंत्रशिक्षण मंडळाकडे पत्रव्यवहार केला असुन सदर निधी आल्यावर बील अदा करणार असल्याचे संगितले. स्थगित राहिलेले एप्रिल,मेचे मानधन जुन व जुलै महिन्यात खर्ची घालून काल अदा केल्याचे स्पष्ट केले. तसेच स्थगित ठेवलेल्या एप्रिल मेचे मानधन शासनाकडून निधी आल्यावर जमा करणार असल्याचे सांगितले.परंतु इब्रामपूरकर यांनी आक्षेप घेत सुरक्षारक्षक स्थानिक आहेत.त्यांच्यावर अन्याय होता नये असे सांगितले.निधी येण्याची वाट पाहु नका.इतर आस्थापनांवर होणारा खर्च तोपर्यंत सुरक्षा रक्षकांच्या खात्यात वर्ग करून येत्या चार दिवसात द्या अन्यथा सहसंचालकांशी मला फोन लावून द्या.इथून हलणार नसल्याचे संगितले. यावर प्राचार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मानधन चार दिवसात देण्याचे कबुल केले.
यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी मानधनाबाबत आमचा बीलांबाबत कॉलेजशी प्रत्यक्ष संबध येत नाही. शासनाशी संबंधित रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ,रत्नागिरी यांच्या ठेक्यामार्फत सुरक्षारक्षकांची नेमणुक झाली असल्याचे सांगितले.नियमितपणे बीले सादर करणे आवश्यक असताना या एजन्सीकडून तसे होताना दिसत नाही.असे सांगितले असता इब्रामपूरकर यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या आठ दिवसात सहाय्यक कामगार आयुक्त,रत्नागिरी यांना बैठकीसाठी बोलावून सुरक्षारक्षकांचा मानधनाचा विषय कायमस्वरुपी निकाली काढणार असल्याचे सांगितले.