– भाजपा सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर
अखेर सात वर्षानंतर कुडाळ मालवण मतदार संघातील रस्त्यांची जबाबदारी घेत आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या हालअपेष्टांचे पातक मान्य केले आहे. त्यांच्या कोवळ्या निरागसतेचे भाजपा मनापासुन कौतुक करत आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी दिली आहे.
खड्डयांमुळे ऐन चतुर्थीतही रस्त्यांवर स्विमिंग टॅंक तयार झाले होते. आजही रुग्णवाहिकेतून हलवल्या जाणाऱ्या पेशंटच्या जीवाची शाश्वती उरलेली नाही. लहानमोठ्या अपघातांची मालिका सुरूच असून लोक मणक्यांच्या आजाराने बेजार झाले आहेत. फक्त आजवर फॉर्च्युनरमधून खाली न उतरल्याने आमदार वैभव नाईक यांच्या हे लक्षात न आल्याने जनतेला हा त्रास झाला होता. अखेर सोशल मीडियाने झोडपल्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेत आमदारांनी निरागस प्रामाणिकपणे ही चूक मान्य करत रस्त्यांची जबाबदारी घेतली आहे. सत्तेत असतानाही जनतेला हालअपेष्टा भोगायला लावत हे सरकार आणि शिवसेना कोकणी जनतेसाठी नसल्याचे दाखवून देणाऱ्या या प्रामाणिक आमदाराचे आम्ही कौतुक करत आहोत, असे अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.