*स्पर्धा गणेश मूर्तीची नको गणेश भक्तीची करा.*
कोकणातील सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आवडीचा सण म्हणजे श्रीगणेश चतुर्थी. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी चतुर्थीला गावी येणारच. कोकणात अगदी पूर्वांपार गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. शेतीची कामे आटोपली की कोकणातील गावांमध्ये असणाऱ्या गणपती शाळेत गणेश मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू होते. गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची चिकनमाती आणून ती लाकडी घन सदृश्य हातोड्याने ठेचून नरम केली जाते, त्यानंतरच त्यापासून रेखीव गणेशमूर्ती तयार केल्या जातात. रात्रंदिवस या गणेश शाळांमध्ये काम सुरू असते तेव्हा कुठे गणेशोत्सव साठी आकर्षक मातीच्या मूर्ती उपलब्ध होतात.
गेल्या काही वर्षांपासून हाताने मूर्ती घडविण्याची पद्धत कमी होऊन गणेशमूर्ती साच्यातून काढल्या जातात, त्यामुळे त्या वजनाने थोड्याफार हलक्या असतात. परंतु वजन उचलण्याची नव्या पिढीची क्षमता पाहता आणि मूर्तीमध्ये अधिक आकर्षकपणा दिसावा तसेच वजनाने हलक्या म्हणून शाडू मातीच्या गणेशमूर्ती कोकणातील शाळांमध्ये बनू लागल्या. परंतु शाडू मातीच्या मूर्ती किमतीला न परवडल्याने म्हणा किंवा आपल्या घरातील मूर्ती दुसऱ्याच्या घरातील मूर्तीपेक्षा मोठी आणि आकर्षक दिसावी यासाठी कित्येकांनी पेण वरून आणल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वेगवेगळ्या चित्रांच्या आकर्षक मोठ्या मूर्तींना पसंती दिली. प्रत्येक कोकणी माणसाला आपल्या घरातील गणेशाची मूर्ती ही मोठी असावी, त्याचे फिनिशिंग आणि रंगकाम उत्तम असावे, लोकांनी वाहवा करावी अशी अपेक्षा असते. त्यातूनच गणेश मूर्तींची स्पर्धा निर्माण झाली त्यामुळे मातीच्या गणेश मूर्तींची मागणी घटली आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशाच्या मुर्त्या कोकणात कित्येक गावांमध्ये पूजल्या जाऊ लागल्या. कोकणात आज गणेशमूर्ती साठी अनेक पर्याय आहेत, चिकन मातीच्या मूर्ती, शाडू मातीच्या मूर्ती, आणि अलीकडेच विकसित झालेला नवा पर्याय म्हणजे देशी गाईचे शेण आणि माती यांच्या वापराने गोमय गणेशमूर्ती.
प्रत्येक व्यावसायिक हा पैसा मिळविण्याच्या दृष्टीनेच व्यवसाय करतो. कोकणातील काही मूर्ती शाळांमधील मूर्तिकार देखील व्यवसायाच्या दृष्टीनेच पेण वरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कमी दरातील मूर्ती कोकणात आणू लागले. अनेकांनी चार महिने मातीत हात घालून मूर्ती घडविण्यापेक्षा एका महिन्यातच रंगकाम करून प्लास्टरच्या मूर्ती विकून बक्कळ पैसा मिळविण्याचे मनसुबे आखले. गावागावात मोठ्या मुर्त्या आणि कमी वजन आकर्षक रंग म्हणून प्लास्टरच्या मूर्तींना मागणी वाढू लागली. परंतु *कोकणात पारंपरिक पद्धतीने मातीच्या मुर्त्या घडविणाऱ्या, आणि भक्तिभावाने पूजन केलेल्या गणेश मुर्त्या पाण्यात विसर्जित करणाऱ्या कोणा भक्तांनी विसर्जन न होणाऱ्या, पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टरच्या मुर्त्या आपण का पूजतो याचा विचार तरी केला का?* दीड दिवस ते अकरा दिवस भक्तिभावाने ज्या गणपती बाप्पाची घरात प्रतिष्ठापना करतो, आरती, भजने करून त्याला आळवितो, आपल्या मनातील इच्छा मनातल्या मनात त्याला पूर्ण करण्याची भिड घालतो, तो कधी पुन्हा येणार हे माहिती असूनही *पुढल्यावर्षी लवकर ये* असे आग्रहाने सांगतो त्याच *गणेशाला प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या विघटन न होणाऱ्या मूर्तींमध्ये घडवून कित्येक दिवस त्याला पाण्यात ताटकळत ठेऊन आपण त्याची विटंबना का करतो?* मातीची गणेशमूर्ती काही तासांमध्ये विसर्जित होते परंतु प्लास्टरची मूर्ती मात्र विसर्जनाच्या प्रतीक्षेत आपण केलेल्या चुकीची आपल्यालाच साक्ष देत वाहत्या पाण्यात वाट पाहत उभी असते विसर्जनाची, मग कधीतरी तुटते, वाहून जाते आणि जलप्रदूषण करत कुठेतरी नदीकिनारी, समुद्र तटावर तुटलेले अवशेष घेऊन पडून राहते, मानवाला त्याच्या चुकीच्या कृत्याची जाणीव करत.
गणेशमूर्ती शाळांनी जरी अशा गणेशमूर्ती विक्रीस आणल्या तरी पूजणाऱ्या गणेश भक्तांनी आपण काय करतो, भक्तिभावाने पूजन करतो की पूजलेल्या श्रीगणेशाची पूजेनंतर विटंबना करतो याचं भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मनात असलेली श्रद्धा भक्तिभाव पाण्यात तुटण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेशमूर्तीपेक्षा मनातला भक्तिभाव तुटू नये याची प्रत्येक कोकणी माणसाने काळजी घेतली तर भविष्यात कोकणात पूर्वीपासून पुजले जाणारे मातीचे श्रीगणेश दिसतील, कोकणची परंपरा राखली जाईल आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कोकणचा पारंपरिक पद्धतीने निसर्गाचे संतुलन राखणारा, पर्यावरणाचे रक्षण करणारा गणेशोत्सव पोचेल, आणि तरंच कोकणी माणसाला श्रीगणेशाच्या पूजेचे खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होईल….कोकणचा गणेशोत्सव नावाजला जाईल.
सरकार बंदी आणणार, कोर्ट कारवाई करणार, किंवा आपणच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पूजणार नाहीत हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. आपण ज्याला सर्वश्रेष्ठ मानतो भक्तिभावाने पूजतो त्याचा मान आपणच ठेवला पाहिजे आणि हे प्रत्येक भक्ताने ठरवले तरंच कोकणचा गणेशोत्सव आगळावेगळा होईल, देवाची विटंबना न होता देवावरची श्रद्धा आणि खरी भक्ती दिसून येईल…
*चला तर आपण स्वतः शपथ घेऊया…..गणेशमूर्ती मातीचीच पुजूनी…..गणपतीची विटंबना थांबवूया…*