You are currently viewing निराधार वृद्धांना आधार, असलदे येथील स्वस्तिक फौंडेशनचा “दिविजा आश्रम”…

निराधार वृद्धांना आधार, असलदे येथील स्वस्तिक फौंडेशनचा “दिविजा आश्रम”…

कणकवलीतील युवकांनी भेट देत केली जीवनावश्यक वस्तूंची मदत..

नव्या युगात नवनवीन क्रांती होत गेली, डिजिटलच्या दुनियेत माणूस प्रगत होत गेला, आधुनिकतेची जोड मिळाल्याने उंच उंच शिखरे पार करत यशाकडे झेपावला. परंतु या क्रांतीत एक खंत राहून गेली ती, यशस्वी होत असताना कित्येक लोक मागे वळून बघायला विसरले, त्यामुळे त्यांचे वडीलधारी निराधार बनले, काही आई बापाला सोडून गेले, तर काही लोक आयुष्य जगायचेच विसरले त्यामुळे आधारहीन झाले. समाजातील अशाच निराधार लोकांना आधार देण्याचं काम केलं ते स्वस्तिक फौंडेशनच्या दिविजा आश्रमाने
समाजातील उपेक्षित लोकांना सन्मानाने जगता यावे, व त्यांना उपचारात्मक सेवा पुरवून त्यांचं पुनर्वसन करून त्यांना एका छताखाली आणता यावे यासाठीच १६ जुलै २०१६ रोजी स्वस्तिक फौंडेशनची स्थापना करण्यात आली. निराधार वृद्धांना आधार देऊन आरोग्य विषयक शुश्रूषा, सेवा पुरविणे, आदिवासी, ग्रामीण भागातील गरजुना मोफत औषध पुरवठा करणे, शिक्षण सुविधा देणे, आरोग्यविषयक शिबिरे, नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया, इत्यादी सेवा पुरविणे, असे निश्चित ध्येय्य समोर ठेऊन मुंबई, रायगड, कोंकण मध्ये स्वस्तिक फौंडेशन काम करते.
स्वस्तिक फौंडेशनच्या असलदे, ता.कणकवली येथील दिविजा वृद्धाश्रमात जवळपास पस्तीस निराधार वृद्ध आहेत. त्यांचा संपूर्ण खर्च, नाश्ता, जेवण, आरोग्य सुविधा, औषधोपचार, दैनंदिन गरजा, कपडेलत्ते सर्व काही स्वस्तिक फौंडेशनच्या माध्यमातून केलं जातं. त्यांच्या सेवेसाठी दहा जणांचा सपोर्ट स्टाफ आहे. लॉक डाऊन मध्ये अशा आश्रमांना मदतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या. अलीकडेच परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे.

त्यामुळे समाजातील मदतीची नितांत गरज असणाऱ्या अशा घटकांना दानशूर व्यक्तींनी मदत देणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे काही आश्रम आहेत जिथे कित्येक निराधार व्यक्ती मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक लोक श्राद्ध, वाढदिवस वगैरे साजरे न करता समाजातील उपेक्षित असणाऱ्या घटकांना मदत देऊन पुण्य पदरात पाडून घेतात. काही मुलामुलींचे ग्रुप एकत्र येत समाजाप्रती आपली जबाबदारी म्हणून आपले पॉकेटमनीचे पैसे काढूनही मदत देतात. समाजात होणारा हा बदल इतरांनीही स्वीकारायला हरकत नाही.
कणकवली येथील काही युवक युवतींनी एकत्र येत कणकवली तालुक्यातील नांदगाव जवळील असलदे येथील दिविजा आश्रमाला भेट देत जीवनावश्यक वस्तूची मदत दिली. कणकवलीतील रोहन रवींद्र गावडे, श्रेयस भास्कर राणे, शुभम परब, संपदा रवींद्र गावडे, या युवक युवतींनी आश्रमला भेट देत स्वतःला जमेल तसे अन्नधान्य देत मदत केली आहे व इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. रोहन रवींद्र गावडे याने इतरांनाही प्रोत्साहित करताना म्हटले आहे की, समाजातील मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अन्नधान्य, कपडे, पैसे इत्यादींची मदत आपल्यापाशी दिल्यास ती जबाबदारीने आश्रम पर्यंत निश्चित पोचवली जाईल. त्यासाठी त्यांनी आपला दूरध्वनी क्र.८४५४०२४१४९ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. ज्यांना स्वस्तिक फौंडेशनच्या खात्यात मदत द्यायची असेल त्यांनी खालील खात्यावर जमा करावी असेही आवाहन करण्यात येत आहे.

आर्थिक स्वरूपात चेक द्यावयाचा असल्यास “SWASTIK FOUNDATION” या नावे द्यावा.
NEFT पाठवायची असल्यास डायरेक्ट खात्यात पाठवू शकता.
खाते क्र. 62483160440
IFSC क्र. SBIN0015445
स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रभादेवी शाखा.
किव्हा ऑनलाईन मदत द्यायची असेल तर “SBI COLLECT” या वेबसाईटवर जाऊन “www.swasticoldeghome. com” मदत देऊ शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा