मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांच्याजवळ मागणी
ओरोस
कळणे खनिज मायनिंग प्रकल्पामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना घर, जमीन, शेती, फळझाडे यांची झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याजवळ निवेदनातून केली आहे. निवेदनात उपरकर यांनी म्हटले की, दोडामार्ग कळणे खाण प्रकल्पातील अतिवृष्टीमुळे अनेकदा भराव वाहून जाऊन खाणीच्या पाण्याचा बांध फुटून शेतकऱ्यांच्या घराचे, घरांतील वस्तूंचे नुकसान झाले असून त्यांच्या जमिनीच्या फळझाडे व शेती याचे नुकसान झाले आहे. सदर भरपाई शासनाने मूल्यांकन करून भरपाई कंपनीकडून मिळण्याकरिता १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. सदर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्याचे मान्य केले होते. मात्र त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. सदर झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महसूल विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग यांच्याकडून मूल्यांकन करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्याचे आदेश व्हावेत. त्याप्रमाणे पिण्याचे पाणी खाणीतील माती जाऊन दूषित झाले आहे, त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत असून पिण्याच्या पाण्याची कंपनीमार्फत तातडीने टँकर किंवा अन्य मार्गाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात यावी अन्यथा मनसेच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळणेकरता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही परशुराम उपरकर यांनी दिला आहे.