डोळ्या येई आज पाणी
मन नाही थाऱ्यावर
दिसे मखर ते सूने
गावी गेला लंबोदर
वाटे घरचा सदस्य
गेला घरटे सोडून
परी जाताना तो गेला
क्षण सुखाचे देऊन
घर एरवी भकास
होते स्नेह्यांनी भरले
टाळ आरती नामात
होते मन हरखले
साऱ्या मुलांचा उत्साह
जात होता ओसंडून
केली आरास सुंदर
बाप्पा येणार म्हणून
होता पक्वान्नांचा थाट
लगबग गौराईची
दहा दिसांचा उत्सव
असे पुंजी आनंदाची
येता विसर्जन वेळ
येई कंठ हा दाटून
येसी मोरया सत्वर
विनवितो सारे जण
©सायली कुलकर्णी