जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
येशील ना बाप्पा लवकर ,वाट तुझी पाहू..
अजून ही वाटते बघ ना,तू नको जाऊ ….
घरघरातून चैतन्याचे वाहतात वारे
नेत्र लावून बसतील, बघ,भक्त तुझे सारे…
विसर्जनाला बाप्पा तुझ्या धजावती ना हात
दहा दिवस मंगलमय ते होती तुझी साथ…
डोळा येते पाणी बघ ना,कसे तुला टाकू
कल्पनेने येतो काटा,दाद कुठे मागू …?
तू येतो मखरी बसतो,होईल आता सुनी
येशील ना रे बाप्पा लवकर,आहे किती गुणी ..
तू चैतन्याचा खळाळता,आहे बघ झरा
पूजा आरती नैवेद्याचा थाट होता न्यारा …
तू सकल कलांचा दाता नि आहे प्रारंभ
हात तुझे रे आशिष देती, भरतो बघ रंग
वर्ष न गेले बघ चांगले,दिवाभीत झालो
भक्तिरसात तरी बघ ना आम्ही तुझ्या न्हालो..
रिद्धिसिद्धिच्या देवा नेहमी हात असू द्यावा
तुझ्या गुणांचा खरोखर बघ वाटतोच हेवा
ठेवून जातो अस्तित्वाच्या खुणा घरभर
गणपती बाप्पा मोरया,येशील ना लवकर…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)