You are currently viewing कुडाळातील भंगसाळ नदी पात्रात मगरींचा मुक्तसंचार

कुडाळातील भंगसाळ नदी पात्रात मगरींचा मुक्तसंचार

कुडाळ शहरातील भंगसाळ नदीत मगरींचा मुक्त संचार वाढला असून नागरिकांना दररोज मगरीचे दर्शन होत आहे. नदीकाठी या मगरी दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित या मगरींच्या बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

भंगसाळ नदीत नवीन बंधारा आणि महामार्गावरील ब्रिज या दरम्यान ३ ते ४ मगरींचे वास्तव्य आहे. मोठ्या मगरीसह तिच्या लहान पिल्लांचा वावर या नदीपात्रात असून दररोज नागरिकांना या मगरींचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. दीड, पाच, व सात दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांना या मगरीचे दर्शन झाले आहे. या मगरींच्या मुक्त संचार यामुळे गणेशभक्तांना जीव मुठीत घेऊन श्रींचे विसर्जन करावे लागत आहे.

यापूर्वी अनेकदा स्थानिक ग्रामस्थांना नदी किनारी मगरी दृष्टीस पडल्या होत्या. त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. मात्र वन विभागाकडून या मगरींचा बंदोबस्त करण्यात कोणतीही उपाययोजना झालेली नाही. या नदीपात्रात ब्रिज, भंगसाळ बंधारा व महापुरुष मंदिराजवळ गणेश घाट येथे गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. तसेच नदीपात्रात महिला कपडे धुण्यासाठीही जात असतात. गुरांनाही नदीपात्रात पाण्यासाठी नेले जाते. या नदीपात्रालगत शेती करण्यात आली आहे. तेथे ग्रामस्थांचा वावर असतो त्यामुळे नदीतील मगरींचा मुक्त संचार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सायंकाळी एक मोठी मगर ऊस शेती लगत नदीकिनारी आल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. गणेश विसर्जन करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या बोटीतून नागरिकांनी या मगरीला पाहिले. वनविभागाने त्वरित त्याकडे लक्ष देऊन मगरींच्या बंदोबस्तासाठी उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा