*लेखणी ….*
अग लेखणी लेखणी माझी सोबतीण बाई
क्षणभर ही मला ती जरा विसंबत नाही
माझ्या मनातून किती मोती ओघळती बाई
मला वाटते खरच रोज तिची नवलाई ….
भरभरून करावे प्रेम शिकविते मला
तिच्या अंगी असती हो किती नानाविध कला
ती असता हातात वाटे स्वर्ग बोटे दोन
रोज शिकविते मला किती किती शाणपण….
बोली वेलींची फुलांची अलगद येते ओठी
जनलोकांच्या सुखाच्या रोज मारते मी गाठी
मला भेटविते रोज किती किती सहृदांना
पुल प्रेमाचा बांधला तिने रोजचा पहा ना …
चंद्र सूर्य नि नक्षत्रे रोज आणते मी खाली
मला आवडते रोज प्रियजनांची खुशाली
फुलमाला अर्पिते मी मनोभावे रोज किती
देवा अखंड राहू दे सुजनांशी माझी प्रीती….
ज्याच्या हातात लेखणी किती असे भाग्यवान
रोज आकाशी झेपावे कल्पनेचे ते विमान
पंख कल्पनेचे देती किती मनाला उभारी
अवकाशात मारते मनोवेगाने भरारी….
देवा तुझे आहे देणे ऋण फेडावे रे कसे?
सरस्वती बनून तू मुखामुखातून हसे …
तुझे हसू कुंदकळ्या हिरे मोती पाचू दाणे
साऱ्या जगाला करशी ज्ञान देऊन शहाणे ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)