८५ लाख रोकड अन् ११ जण ताब्यात
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ मांडण्यात येतो. अनेक क्लब चालक आपलं क्लबमध्ये जुगाराचा खेळ करून लाखो रुपयांची उलाढाल करीत असतात. तर काही पांढरपेशा गर्भश्रीमंत लोकांसाठी देखील अंबरनाथ मध्ये काही बडे हस्ती जुगाराचा खेळ आणि खेळासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देत असतात.
अंबरनाथ मध्ये देखील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या शिवाजीनगरच्या फार्मिंग सोसायटीमधील फार्महाऊसवर मोठा जुगाराचा अड्डा तयार केला होता. या अड्ड्यावर गणेशोत्सवाच्या काळात तिरिक्त पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये रोख ८५ लाख रुपयांसह ११ आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांनी त्यासंबंधित बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळेस घडल्याने हे प्रकरण दडवण्यासाठी देखील पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर केल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.
अटक केलेल्या आरोपींचे अरुण विष्णू पाटील, आतिष पंढरीनाथ पाटील, ललित धुपचंद परमार, अजय संजय मोहोरीकर, प्रभात बिरजू जैस्वाल, आनंद रामचंद्र रेड्डी, भास्कर कृष्णा राऊत, जिग्नेश अरविंद परमार, सचिन मल्लप्पा मंचेकर, प्रज्योत जनक म्हात्रे, प्रवीण श्रीनिवासराव सदरला अशी नावे आहेत.