You are currently viewing मनातले……

मनातले……

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना

पाठीवरचे ते ओझे पहा लिलया पेलते
ओझे मनावर भारी तगमग ते करते
मन मोकळे करावे असा भेटावा लागतो
दमदार असेल तो ओझे हलके करतो….

पाठीवरचे असो वा ओझे मनावरचे ते
वागवणे नाही सोपे अहो हैराण करते
मन मोकळे करावे असा कोणता सुहृद
सापडणे हो मुश्किल पहा असा गोडमध..

सारे स्वार्थाचे पुतळे इथे कोणाला पडली
साथ सोडून हो जाते अंधारातही सावली
एक माऊली सोडता सारे असती उसने
जरा काही बोलताच पहा धुतातच धुणे …

कुठे काही बोलू नये नाही राहत गुपित
आपुल्याच सवे जावे सारे आपले संचित
मानभावी पणाला या उगा भुलू नये कोणी
सारे टपलेले बोके टाळूवर खाण्या लोणी …

जात ओळखावी पहा पत ओळखावी मने
नाही सापडत येथे.. सारे मोडलेले कणे
आधाराचा हात पहा कसा शाश्वत असावा
अर्ध्यावरती सोडतो .. होई मना पसतावा…

मायबापच जगात सुखदु:ख्खाचे हो धनी
फुशारक्या मारू नये पहा उगाचच कोणी
नाळ नाहीच तुटत आणि लेकरांची चिंता
तुझी रूपे असतात मायबाप भगवंता …

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा