सिंधुदुर्गनगरी
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तिलारी नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या आहेत.
याबाबत पुढीलप्रमणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळी-आवाडे, साटेली, भेडशी, मणेरी, कुडासे गावातील ग्रामस्थांना सदर बाबीची माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सदर बाबतीत सूचना प्रसिद्ध करावी. रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपात्रातून ये जा करू नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यकती दक्षता घ्यावी. गणेशोत्सव कालावधीत गणपती विसर्जन करताना नागरिक, ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी. तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तालुक्यातील शोध व बचाव साहित्य तयार ठेवावे. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास 02362-228847 या संपर्क क्रमांकावर त्वरीत माहिती द्यावी. अशा सूचनाही श्रीमती साठे यांनी दिल्या आहेत.