कोरोना संख्या वाढण्याची भीती
संपादकीय….
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील निर्बंध उठवले तरी सिंधुदुर्ग जिल्हा वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्येने कित्येक महिने रेड झोन मध्ये होता. राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होता. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनी देखील जिल्ह्यात कोरोना संकट आवाक्यात येत नव्हते, त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना इतर राज्यांच्या सीमा बंद होत्या, बाजारपेठेवर निर्बंध वाढविले होते. अलीकडेच जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा शंभरच्या आत आला आणि मृत्यू संख्या देखील एक आकडी आली आहे. जिल्ह्यातील निर्बंध बऱ्याच प्रमाणात हटविले गेले, बाजारपेठ खुल्या केल्या तरीही बाजारपेठेत लोकांची गर्दी दिसत नव्हती.
गणेशोत्सव अवघ्या तीन चार दिवसांवर आल्याने आणि पुढे बाजारपेठेत गर्दी वाढत जाईल तर धोका उत्पन्न होऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरून लोकांनी सावंतवाडी बाजारपेठेत आजपासूनच गर्दी केली आहे. कोरोनाचा धोका कमी होतो न होतो नागरिकांनी तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टनसिंग पाळणे हे नियम पायदळी तुडविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ सामंत हे देखील कोरोनाचा कहर टाळू शकले नाहीत, तिथे सर्वसामान्य माणसांची काय अवस्था होईल हे न सांगितलेच बरे. कोरोना होऊन गेलेल्या आणि त्यावर अँटीबीओटीक औषधांचा मारा केलेल्या लोकांना आज दोन तीन महिन्यानंतर देखील रक्त साकाळणे, डोकेदुखी, केस गळती, अशक्तपणा असे अनेक त्रास उद्भवत आहेत. कोरोनाचे एवढे दुष्परिणाम असूनही भर बाजारात फिरताना लोक सुरक्षा बाजूला सारून निर्धास्तपणे वावरतात याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाने गणेशोत्सव काळात बाजारपेठेत होणारी गर्दी टाळता येत नसेल तर निदान नागरिकांना मास्क वापरण्यासाठी आवाहन केले पाहिजे. अन्यथा गणेशोत्सवानंतर जिल्ह्याची आरोग्य स्थिती पुन्हा एकदा बिघडून जिल्ह्यावर निर्बंध लादले जातील यात शंकाच नाही. स्वतःच्या आरोग्याची काळजी नागरिकांनी स्वतः घ्यावयाची असून भविष्यात धोका उत्पन्न झाल्यास चाकरमानी आणि प्रशासनास दोष देण्यात काहीच अर्थ उरणार नाही.