जागतिक “सा क व्य” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना
मनामनात श्रावण येई आनंदा उधाण
डहाळीवर आंब्याच्या पहा झोके घेई मन
लेकी येती माहेरास सुखदु:ख्ख वाटतात
पुन्हा आशेच्या या ज्योती मनातून पेटतात…
असा महान महिना सणवार येती खूप
दरवळे घरातून देवापुढती हो धूप
पावसाची लागे झड शेते फुलारून येती
फुले सांडतात खाली सुगंधित होते माती ….
झुले झुलतात मनी साजणाचा ये आठव
माहेराहून आई मला सासरी पाठव
येती सरावरसरी हेलकावते हो मन
वेड लावतो जीवाला असा साजरा श्रावण ..
बांधाबांधावर पहा कशी मुरके जवार
हिरवा शालू नऊवारी उडे हवेत पदर
चावळते चावळते वारा घालतो फुगडी
चवळी गवार मुगाची पानाआड ती बुगडी ….
चोची उडती आकाशी शेतावरती चादर
हाती घेऊन गोफण शेतकऱ्याचा जागर
पाचू पेरतो श्रावण मनमनात हिरवा
आत बाहेर साराच प्रसन्नतेचा गारवा …..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)