You are currently viewing कामगारांचे प्रलंबित प्रस्ताव १५ दिवसात मार्गी लावणार… मनसेच्या शिष्टमंडळाला कामगार अधिकारी कार्यालयाकडून आश्वासन

कामगारांचे प्रलंबित प्रस्ताव १५ दिवसात मार्गी लावणार… मनसेच्या शिष्टमंडळाला कामगार अधिकारी कार्यालयाकडून आश्वासन

मनसेने दिला होता “ठिय्या” आंदोलन करण्याचा इशारा

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत कामगारांचे माहे जानेवारी 2021 पासूनचे प्रस्ताव कार्यालयात प्रलंबित असल्याने कामगारांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे. शिवाय मंडळाने ऑनलाईन कार्यपद्धती अवलंबिल्याने यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेले प्रस्ताव कार्यालयात मंजुरीसाठी धूळखात पडून होते. मनसेने या संदर्भात आक्रमक पवित्रा घेत सोमवारी कामगार अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता.त्या अनुषंगाने आज मनसेच्या शिष्टमंडळाला कामगार अधिकारी कार्यालय व्यवस्थापनाने मागण्यांसदर्भात चर्चेसाठी बोलून सकारात्मकता दाखविली.यामध्ये यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेले कामगारांचे प्रस्ताव ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेत तात्काळ मंजुरी द्यावी, कामगारांच्या पाल्यांचे आधार कार्ड व संबंधित शाळा संस्थेचा तपशील जमा केल्यानंतर शिष्यवृत्ती प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत, कामगारांना नोंदणी व नूतणीकरणासाठी नोंदणीकृत कंत्राटदाराचा अट्टाहास न करता ग्रामसेवकांनी प्रमाणित केलेल्या कामगारांना लाभ देण्यात यावा,निधन झालेल्या कामगारांच्या वारसांना तात्काळ अपघाती व नैसर्गिक मृत्यू साठीचा क्लेम मंजूर करण्यात यावा,कोविड-19 प्रोत्साहन लाभ न मिळालेल्या कामगारांना तात्काळ अनुदान अदा करावे आदी मागण्यांसंदर्भात कामगार अधिकारी कार्यालय व्यवस्थापनाने पंधरा दिवसात कार्यवाही करुन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व कोरोना आपत्ती कार्यकाळ विचारात घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.त्यानुसार मनसेने आपले नियोजित आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित केल्याची माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा