स्टाफ कमी करत कोविड सेंटर बंद करून सरकार सिद्ध काय करणार?
विशेष संपादकीय…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सव काळात लाखो चाकरमानी येतात. पावसाळ्याचे दिवस, तापमानात होणारे बदल यामुळे जिल्ह्यात उद्भवणारी सर्दी, तापसरीची साथ. सध्या दिवसाला नव्याने मिळणारे कोरोनाचे सरासरी ७०/८० रुग्ण आणि होणारे चार ते पाच मृत्यू पाहता येत्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढण्याचीच भीती आहे. असे असतानाही सरकारने कोरोनाच्या काळात कोरोनाच्या सेंटर करिता घेतलेले अतिरिक्त कर्मचारी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे कारण पुढे करत कमी केले.
एकीकडे सरकार जनतेला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा असे आवाहन करत आहे. सरकारच्या मालकीच्या बीएसएनएल मोबाईल वरची कोरोनाची रिंगटोन सुद्धा सुरू आहे परंतु कोरोना पासून मुक्ती मिळण्यासाठी उभारलेली कोविड केअर सेंटर मात्र बंद केली आहेत. कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून सरकार जनतेला घाबरवत असून स्वतः मात्र विपरीत वागत आहे, त्यामुळे जनतेच्या मनात तिसऱ्या लाटेबाबत देखील संभ्रम असून नागरिकांनी मनमोकळे वावरायला सुरुवात केली आहे. कोविड सेंटरमध्ये स्टाफ नसल्याचे कारण देत कोविड सेंटर बंद केल्याने रुग्णांना अन्यत्र हालविण्यामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत, काही रुग्णांना खाजगी दवाखान्यात हलविल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक भुर्दंड पडत आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात रुग्ण वाढल्यास सरकार पुन्हा नव्याने कोविड सेंटर सुरू करणार का? पुन्हा काढून टाकलेला कर्मचारी वर्ग गरज पडल्यावर सरकारच्या मदतीला धावणार का? असे प्रश्न सर्वसामान्य जिल्हावासीयांना पडले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा भय दाखवत असतानाच हिंदूंच्या सणांवर, गणेश मूर्तींच्या उंचीवर देखील निर्बंध घातले जात असताना सुमारे २७२ कोविड सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कमी करून सरकार काय साध्य करणार आहे? गणेशोत्सव, दिवाळी आणि नाताळ सणांमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येतात त्यामुळे कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत सेवा देण्यास मुदतवाढ मिळणे आवश्यक होते. गरज पडल्यास सरकार कोविड केंद्र सुरू करू शकते, परंतु स्टाफ रुजू करताना मात्र कसरत करावी लागणार, त्यामुळे जिल्ह्याची स्थिती भविष्यात कठीण होण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या लाटेत नवनवीन कोविड सेंटर सुरू करून फोटोसेशन करणारे लोकप्रतिनिधी सध्यास्थितीत जिल्ह्यात रोज कोरोनाने रुग्ण दगावत असतानाही जिल्ह्यातील कोविड सेंटर सरकार बंद करत असतानाही मूग गिळून गप्प का? हा प्रश्न मात्र निरुत्तर करत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त डॉ रामास्वामी एन. यांच्या पत्रानुसार कोविड-१९ साठी घेण्यात आलेल्या मनुष्यबळासाठी केंद्र सरकारने फंड उपलब्ध करून दिलेला नाही, त्यामुळे सेवा समाप्त करावी असे निर्देश दिल्याने जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी, सत्ताधारी याबाबत काही आवाज उठवणार आहेत की गप्प बसून मजा बघणार आहेत? असा सवाल सर्वसामान्य जिल्हावासीय करत आहे.