फसवणूक झालेल्या तरूणाची सायबर सेलकडे धाव…
कणकवली
महिन्याला तीन ते दहा हजार रुपये कमविण्याच्या आलेल्या मेसेजच्या माध्यमातून एका तरुणाने ॲप डाऊनलोड केले. या ॲपच्या माध्यमातून रोजगार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात रक्कमही पाठवली. त्याचा परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर तरुणाला १ लाख ९० हजाराचा गंडा बसला. या तरुणाने बँकेशी संपर्क साधला असून पोलिसांच्या ऑनलाईन सायबर पोर्टलवर ही तक्रार दाखल केली आहे.
त्या तरुणाच्या मोबाईलवर २५ ऑगस्ट रोजी ॲमेझॉन मध्ये पार्ट टाइम जॉब आपण करू शकता आणि महिन्याला तीन ते दहा हजार कमवू शकता असा मेसेज आला होता. त्यानुसार earn aap डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला त्याच्याकडून एक हजार रुपये मागण्यात आले. त्याने ही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर त्याला जवळपास दोन ते अडीच हजार रुपये पुन्हा अकाउंटला जमा झाले. त्यानंतर त्याच्या कडून जवळपास ३० हजार रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी मागण्यात आले व त्याने ते जमा ही केले. ही रक्कम त्याने आपल्या ज्या दोन बँक अकाऊंट च्या माध्यमातून भरणा केली त्या दोन बँक अकाऊंट मधून २९ ऑगस्ट रोजी एक लाख साठ हजार एवढी रक्कम अचानक काढण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा ओटीपी न मागता ही रक्कम ॲपच्या माध्यमातून काढण्यात आल्याने हा तरुण पुरता चक्रावून गेला. त्याने दोन्ही बँकांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर पोर्टलवर ही तक्रार दाखल केली आहे. मात्र अशाप्रकारे झालेल्या या ऑनलाईन फसवणुकीत ही रक्कम तरुणाला मिळणार का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.