You are currently viewing बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर भाजपचा रास्ता रोको

बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर भाजपचा रास्ता रोको

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर उमटले तीव्र पडसाद

बांदा

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर बांद्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी आक्रमक झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमच्या नेत्यावर झालेला अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याने जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा यावेळी उपसभापती शीतल राऊळ यांनी दिला.

यावेळी बांदा पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान श्री. राणे यांना झालेली अटक ही चुकीच्या पद्धतीचे आहे. ठाकरे सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करून राणेंना नाहक त्रास देण्याचा कुटील डाव रचला आहे. त्यामुळे त्यांची हुकूमशाही आम्ही खपवून घेणार नाही, वेळप्रसंगी आमच्या कोणी अंगावर आले, तर त्यांना शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे,असा इशाराही उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, सरचिटणीस दादू कविटकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बाळू सावंत, उमेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, विकी केरकर, ज्ञानेश्वर सावंत, प्रवीण देसाई, मधू देसाई, साई सावंत, साई धारगळकर, डॉ. भालचंद्र कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित, माजी सरपंच मंदार कल्याणकर, दीपक सावंत, सचिन वीर आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा