व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार..
एन्काउंटरमध्ये ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी एका पोलीस नाईकासह, बोगस पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता असे एकूण 7 जणांना अटक केली आहे. तसेच आणखी दोन आरोपी हे फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेकडील गांजा विकणारा व्यापारी समीर सकपाळ (वय 35) या इसमाचे 14 ऑगस्टला अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी सकपाळला अज्ञातस्थळी नेले. तिथे आरोपींनी सकपाळला धमकी दिली.
“आम्ही पोलीस आहोत. तुझ्या एन्काउंटरची वरुन ऑर्डर निघाली आहे. तुला चकमकीत ठार मारायचं आहे. त्यामुळे वाचायचं असेल तर 12 लाख रुपये दे”, अशा शब्दात आरोपींनी खंडणी मागितली.
सात जणांना बेड्या
यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सकपाळ याच्याकडील 50 हजार रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे लॉकेट असा ऐवज काढून घेतला होता. नवघर पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन 7 जणांना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.