भाजपा नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा सवाल
राणेंवर टीका करून उद्धव ठाकरे यांचे मंत्रीपदासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी गेले काही दिवस आमदार वैभव नाईक हे सातत्याने खटाटोप करत आहेत. राणेंचा बंगला पाडण्याचे आव्हान देणारे वैभव नाईक हे कणकवली शहरातील त्यांची असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची हिम्मत दाखवतील काय? असा सवाल भाजपचे नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.
आमदार वैभव नाईक यांची एक नाही तर अनेक अनधिकृत बांधकामांची यादी आमच्याजवळ आहे. त्यात करून नगरसेवक सुशांत नाईक यांच्या अनेक अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तर उपोषण हे देखील झालेली होती. त्यातील काही प्रकरणात न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले आहेत. सुशांत नाईक यांनी त्या उपोषणा वेळी गयावया केल्याने ती उपोषणे थांबली होती. राणेंवर टीका करून आपण प्रकाशझोतात राहू पाहणाऱ्या वैभव नाईक यांना त्यांच्या नगरसेवक असलेल्या भावापासून त्यांच्या स्वता च्या अनधिकृत बांधकामांची हवी तर यादीच आमच्याकडे आहे. हिम्मत असेल तर ही अनधिकृत बांधकामे स्वतःहून पाडण्याची तयारी नाईक दाखवतील काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना किंवा त्यांच्यावर अनधिकृत बांधकामाचे आरोप करत असताना स्वतः आमदार असलेल्या वैभव नाईक यांनी त्यांच्या बंगल्यापासून नदीचे असलेले पात्र याचे साईड मार्जिन सोडलेले आहे का? स्वता चा बंगला वाचविण्यासाठी हायटेन्शन लाईन शिफ्टिंग साठी शासनाचे कोट्यावधी रुपये वाया घालवले. हे देखील सर्वांना माहिती आहे. अनधिकृत बांधकामाचे बादशहा म्हणून आमदार वैभव नाईक व त्यांच्या भावांना कणकवलीत ओळखले जाते. त्यामुळे राणेंना आव्हान देण्यापेक्षा नाईक यांनी आपली अनधिकृत बांधकामे तोडण्याच्या आमच्या आव्हानाला स्वीकारण्याची हिम्मत दाखवावी असा टोला श्री परुळेकर यांनी लगावला आहे.