You are currently viewing गुन्हे प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट

गुन्हे प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट

अवैध दारू प्रकरणी 8 जणांवर कारवाई, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील गुन्हांना प्रतिबंध घालणे व उघडकीस आणणेकरिता दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी 5.00 वा. ते 12.00 वा. पर्यंत या वेळेत ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली पोलीस ठाणे हद्दीत अवैध गोवा बनावटीची दारु व गावठी हातभट्टीची दारु बाळगल्या प्रकरणी 8 जणांविरुध्द गुन्हे दाखल करुन 16 लाख63 हजार 730 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

              हे ऑपरेशन परिणामकारक होण्यासाठी जिल्ह्यात विविध व महत्वाचे ठिकाणी फिक्स पॉईंट, नाकाबंदी, सक्त रात्रगस्त, कोंबिग ऑपरेशन, पेट्रोलिंग नेमण्यात आलेली होती. यामध्ये पोलीस अधीक्षक यांच्यासह 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 12 पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 169 पुरुष व महिला अंमलदार सहभागी झालेले होते.

            ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यात 32 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करुन एकूण 744 वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन अधिनियम कायद्यांतर्गत 213 केसेस करण्यात आल्या असून 52 हजार 100 रुपये दंड आणि विना मास्कच्या 69 केसेस करण्यात आलेल्या असून रुपये 10 हजार 800 दंड वसूल करण्यात आला. कोव्हीड-19 अनुषंगाने भा.दं.वि.सं. कलम 188 अन्वये 2 केसेस दाखल करण्यात आल्या.

            जिल्ह्यात 18 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करुन संशयित ठिकाणे, 47- हॉटेल, 34- लॉज, 12- धाबे, व 407 इसम तपासण्यात आले. तसेच जिल्ह्यात अभिलेखावर असलेले मालमत्तेच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील माहितगार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील 13 हिस्ट्रीशीटर चेक केले असून 8 मिळून आले. तसेच रेकॉडवरील पाहिजे व फरारी 13 आरोपींना चेक करण्यात आले.

                        तसेच जुगार सदराखाली कणकवली पोलीस ठाण्यात एका इसमाविरुध्द कारवाई करुन त्यांचेकडून रोख रक्कम 2 हजार 220 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा