You are currently viewing आचिर्णे व कुंभवडे गावांचा नवा आदर्श

आचिर्णे व कुंभवडे गावांचा नवा आदर्श

स्वातंत्र्यदिनी झेंड्याची दोरी दिली गुणवंत विद्यार्थीनींच्या हाती

वैभववाडी
तालुक्यातील आचिर्णे व कुंभवडे गावाने नवा आदर्श घातला आहे. या गावात स्वातंत्र्यदिनी झेंड्याची दोरी गुणवंत विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आली आहे. या गावाने नव्याने घातलेला पायंडा हा निश्‍चितच आदर्शवत असा आहे. 75 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्षी तालुक्यातील कुंभवडे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन बारावीत उत्तम यश संपादन केलेल्या विनिता राणे व अंकिता मुळये यांच्या हस्ते पार पडले. बारावीत विज्ञान शाखेतून विनिताला 97 टक्के, तर अंकितला 95 टक्के गुण मिळाले आहेत.

तसेच यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे विद्यालयाचे ध्वजारोहण शकुंतला संतोष शेळके हिच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता दहावी मध्ये शकुंतलाने उज्वल यश संपादन केले आहे. त्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे, तसेच नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक घोडदौडीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थ यांनी हा एकमुखी निर्णय घेतला. नारी शक्तीचा गावाने केलेला सन्मान हा निश्चितच कौतुकास्पद आहे.

कुंभवडे येथे ध्वजारोहन प्रसंगी सरपंच मिलिंद गुरव, उपसरपंच विनोद कदम, माजी सभापती रमेश तावडे, नंदू शिंदे, प्रमोद सावंत, पप्पा तावडे, सुरेखा चव्हाण, चैताली चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आचिर्णे येथे ध्वजारोहन प्रसंगी सरपंच रुपेश रावराणे, माजी वीत्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, जयसिंग रावराणे, उत्‍तम सुतार, आदेश रावराणे, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा