स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
साजरा हा आज होत आहे.
स्वातंत्र्यासाठी दिले बलिदान
आत्मा त्यांचा अतृप्त राहे.
नियम कायदे खेळच केले
लाखो खटले प्रलंबित झाले.
याच स्वातंत्र्यासाठी का ते
स्वातंत्र्यवीर फासावर गेले.
मतदार हा तेव्हा राजा होता
मतांसाठी इथे लुटती धन.
गाडी घोडे असती मागेपुढे
निवडूनी येता विसरती जन.
महागाईचा उसळला आगडोंब
आश्वासनेही ती विरली हवेत.
नोकरी धंदेही सारे बंद पडले
सांगा कसे ते जग घ्यावे कवेत.
पाच वर्षांच्या सेवेसाठी म्हणे
आयुष्यभर पेन्शन खात्यात.
राब राब राबून शेतकऱ्यांच्या
कोलीत अन फुंकणी हातात.
पंचाहत्तरी साजरी होत आहे
म्हाताऱ्याची लाकडे मसनात.
कागदावरच्या योजना केव्हाच
गुंडाळल्या जातात बासनात.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर
८४४६७४३१९६