होता सुरुवात श्रावणाला
पसरे आनंद हर्ष उल्हास सारा
नटली पाना फुलांनी धरा
हिरवे रान लेवूनी मोती,
चमकती दवबिंदूंनी पाती
सुटता वारा मिळे गारवा,
माळावर फुले मोर पिसारा.
थुई थुई थुई थुई मोर नाचे
प्रभातकाली ऊन पसरे
झाडापेडांमधूनी डोकावे
जणू धरा ही प्रेमात पडे.
सण पहिला श्रावणातला
आला सण नागपंचमीचा
सजला पाट रंगल्या भिंती
रांगोळी काढली पाटा भोवती
अळवाच्या पानावर शोभे
नागराज हे मूर्तिमंत उभे
दूध लाह्यांचा नैवेद्य दाविला
हळदीच्या पानात थापूनी
उकडीच्या केल्या पातोळ्या
हळद पिंजर अष्टगंध लावूनी
पत्री फुले दुर्वा वाहूनी
दीप धूप दिव्यांनी ओवाळूनी
भक्तिभावे नागराज पूजिले.
नागराज हा मित्र शेतकऱ्यांचा
करी रक्षण शेतांचे
फुल वाहूनी वारुळाला
ऋण फेडतो राजा सापाचे
माहरेवाशी बहिणी लाडक्या
ठेवीती उपवास भावासाठी
हिंदू संस्कृती अन परंपरेचा
सण पहिला आनंदाचा
श्रावणात या गोडधोड नैवेद्याचा…
(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी