You are currently viewing सर्वच क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल स्व. रामकृष्ण मसुरकर कुटुंब

सर्वच क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल स्व. रामकृष्ण मसुरकर कुटुंब

संपादकीय…..

सावंतवाडी शहरात काही घराणी ही आपली एक वेगळी ओळख टिकवून आहेत. अनेक वर्षे शहरात वास्तव्य करून आदर्शवत जीवन जगताना समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आहेत, समाजात वावरताना आपली कर्तव्ये पार पाडताना, समाजकार्यात देखील हातभार लावत आहेत. माजी नगरसेवक आणि जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र उर्फ राजू मसुरकर हे सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. राजकारणा बरोबरच समाजकार्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील गोरगरिबांना जिवनरक्षा वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून अतिशय मोलाची मदत करत आहेत. अनेक हृदयरोगीना त्यांनी मदतीचा हात देत हृदयावरील शस्त्रक्रियांसाठी सरकारच्या महात्मा फुले योजनेच्या सुविधा मिळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे कित्येक गोरगरीब रुग्णांना नवीन जीवन मिळाल्याचे समाधान मिळत आहे.
मालवण तालुक्यातील मसुरे येथून स्वर्गीय रामकृष्ण मसुरकर हे आपल्या आईसोबत सावंतवाडीत आले होते. आपल्या कुटुंबियांसोबत उभाबाजार येथे राहत पुढे मोठे झाल्यावर त्यांनी पीठ, मसाला, भात, तेल अशा विविध गिरणी चालू करून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर उभाबाजार येथेच लाकूड गिरणी, सोन्या चांदीची दुकाने व किराणा मालाचे दुकान देखील सुरू केले. १९३२ साली त्यांनी कोलगाव येथे लाकडाची गिरणी सुरू केली आणि असेच विविध व्यवसाय करत पुढे स्व. रामकृष्ण मसुरकर हे यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले. त्यांचाच वारसा पुढे चालवीत त्यांच्या मुलांनी, नातवंडे, पतवंडे यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेत अनेक उद्योग, व्यवसाय सुरू करून मसुरकर कुटुंबाचे नाव सातासमुद्रा पलीकडे नेले.
स्व.रामकृष्ण मसुरकर यांची मुले, नातवंडे, पतवंडे विविध क्षेत्रात कार्यरत असून मुख्यत्वे उद्योजक, आरोग्य सेवा, वकिली व्यवसाय, चार्टर्ड अकाऊंटंट, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सोन्याचांदीचे व्यापारी, लाकूड गिरणी, किराणा व्यापारी, मोटारसायकल शोरूम, विविध इंजिनिअरिंग विभाग, शेती-बागायती, अशा विविध क्षेत्रात काम करत असून कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या विभागात १८ तज्ञ डॉक्टर म्हणून सेवा बजावत आहेत. प.पू. माधव रामकृष्ण मसुरकर यांच्या स्नुषा सौ.वैशाली या मुंबईत डॉक्टर म्हणून कार्यरत असून कै. प्रभाकर मसुरकर यांची नात दीक्षा दत्तात्रय मसुरकर या सातारा येथे डॉक्टरीचे शिक्षण घेत आहे. जनार्दन मसुरकर यांची कन्या डॉ. चारू या मुंबईत कार्यरत असून त्यांचे पती देखील डॉक्टर आहेत. तर त्यांची कन्या लीना तायशेटे या कोकिळाबेन रुग्णालयात भुलतज्ञ म्हणून बाल विभागात कार्यरत आहेत.
त्याच बरोबर कै. विश्वनाथ मसुरकर यांचे मुलगे डॉ. प्रवीण व स्नुषा डॉ. प्राजक्ता हे सावंतवाडीत रुग्णसेवा बजावत आहेत. तसेच कै. वसंत मसुरकरांचे चिरंजीव डॉ. उमेश हे सावंतवाडी नगरपालिकेत तर त्यांची पत्नी डॉ. सौ. संगीता या खाजगी सेवा देत आहेत. डॉ.उमेश यांची कन्या डॉ. निकिता ही कृष्णा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस होऊन सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालयात सेवेत आहे. तसेच कै. वसंत मसुरकरांची नात डॉ. अंकिता अजित मसुरकर या पुण्यात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून परीक्षा दिली असून लवकरच रुग्णसेवेसाठी तयार होत आहेत. तर तिचीच बहीण डॉ. दीपिका अजित ही डेंटिस्ट होऊन पुढील पॅरा डेंटल शिक्षणासाठी नागपूर येथे गेली आहे. कै. वसंत मसुरकर हे सावंतवाडीच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये तहयात ट्रस्टी होते. त्याचबरोबर रमाकांत मसुरकर यांचे चिरंजीव डॉ. नित्यानंद मसुरकर हे एमबीबीएस होऊन आंबोली प्राथमीक केंद्रात काही वर्षे सेवा देऊन आता ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी उत्तम रुग्णसेवा दिल्याने अनेक रुग्ण आणि नातेवाईक त्यांचे नाव काढत असत. त्यांच्या पत्नी डॉ नंदिनी नित्यानंद या देखील होमिओपॅथी तज्ञ आहेत. रमाकांत मसुरकर यांची कन्या डॉ. रेखा मसुरकर शिरगाव देवगड येथे खाजगी सेवा देत असून त्यांचे पती डॉ. पारकर देखील आरोग्यसेवेत असून दोन्ही मुले फिलिपाईन्स येथे डॉक्टरी चे शिक्षण घेत आहेत. रामकृष्ण मसुरकर यांची बहिण सुशीला शिरसाट यांचा मुलगा जेष्ठ पत्रकार कै.अरविंद शिरसाट असून सुशीला यांची सून डॉ. राजश्री अरविंद शिरसाट या माडखोल, धवडकी येथे खाजगी दवाखाना चालवत आहेत, नात मधुरा ही गोव्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
स्व.रामकृष्ण मसुरकर यांच्या कुटुंबाची यशस्वीपणे वाढणारी ही अमृतवेल समाजात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे. केवळ आपल्या कुटुंबासाठी न जगता समाजासाठी देखील मसुरकर कुटुंबीयांनी उत्तम योगदान दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीत मसुरकर कुटुंबाचे नाव मोठ्या आदराने घेतले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा