अधीक्षक अभियंत्यानी दिले लेखी आश्वासन : भाजपचे चक्काजाम आंदोलन तब्बल तीन तासानंतर मागे
बांदा
बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत पावसाळी डांबरीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी दिल्याने भाजपने आज केलेले चक्काजाम आंदोलन तब्बल तीन तासानंतर मागे घेतले. तात्काळ कामास सुरुवात न केल्यास प्रखर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी दिला.
बांदा-दोडामार्ग रस्ताच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी भाजपने बांद्यात चक्काजाम आंदोलन केले.यावेळी निष्क्रिय प्रशासन व पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी अधीक्षक अभियंता यांच्यावतीने लेखी आश्वासन दिले. यावेळी राजन तेली यांच्यासह सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.