संपादकीय…..
आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावास्या… जी दीप अमावास्या म्हणून संपूर्ण देशात घरातील दिव्यांची विधिवत पूजा करून साजरी केली जाते. परंतु काही ठिकाणी आषाढातील या अमावास्येला गटारी अमावास्या असेही म्हटले जाते. खरतर या दिवशी दिव्यांना दूध पाण्याने स्वच्छ धुवून घरातील सवाष्ण स्त्रीने पाटावर वस्त्र आणि पाटाभोवती रांगोळी काढून दिवे ठेवावेत आणि आघाडा, दुर्वा, पिवळी फुले वाहून त्याची पूजा करावी. या दिवसापासून पत्रीचे महत्व सुरू होते. दुर्वा हा वंशवृद्धीच्या प्रतीक आहेत, त्यामुळे लहान मुलांचे औंक्षण करावे व गोडाचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. “हे दीपा, तू सुर्यरुप व अग्निरुप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर”.
गटारी हा शब्द म्हणजे लोकांच्या दृष्टीने आषाढ संपून श्रावण सुरू होणार, म्हणजे श्रावणात अनेक लोक मास, मच्छी, मांसाहार वर्ज्य करतात त्यामुळे पुढील महिन्यात मासे, मटण खायचे नाहीत ते आजच्या एकाच दिवशी भरपूर प्रमाणात खाऊन, पिऊन मजा मस्ती करायची आणि एका महिन्याची उणीव भरून काढत अगदी गटारात लोळे पर्यंत मांसाहार व मद्यप्राशन करायचे असा बेत असतो. परंतु शक्यतो हा दिवस साजरा करताना गटारात कोणीच लोळत नाहीत. तर जे श्रावण पाळतात किंवा पाळत नाहीत त्यांना हा दिवस म्हणजे एक बहाणा असतो. खरं म्हणजे गटारी हा शब्द विनाकारण जोडला गेलेला असून काही प्रमाणात आपले हिंदू लोकच तो खरा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या प्रत्येक हिंदू सणाला एक संस्कृती आहे याची जाणिव ठेवली पाहिजे, त्याची जपणूक केली पाहिजे.
गटार म्हणजे गताहार, गत=मागील, जुने, गेलेले, आता नसलेले,
आणि आहार= भोजन. म्हणजेच गत + आहार = गताहार
गत + आहार + अमावस्या = गताहारी अमावस्या.
या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते. गत महिन्यात केलेला आहार त्यागून सात्विक, शाकाहारी भोजन करायचे असते. श्रावणात प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो, ज्यामुळे त्यांची उत्पत्ती, वाढ होते. त्यांचे रक्षण करण्याचा देखील हेतू असतो. तसेच ऊन, पाऊस अशी स्थिती असल्याने ओलावा असलेले मासे, मटण यांच्यावर जंतुसंसर्ग लवकर आणि जास्त प्रमाणात होतो, त्याने मानवाच्या प्रकृती, आरोग्यावर दुष्परिणाम होतात म्हणून मांसाहार वर्ज्य करायचा असतो. या महिन्यात मांसाहार केल्याने तो लवकर पचन देखील होत नाही म्हणून पचनास जड असलेले पदार्थ श्रावणात टाळले जातात. त्याचप्रमाणे श्रावणात अळंबी सारख्या अनेक प्रकारच्या रानभाज्या बऱ्याच प्रमाणात रुजतात, अगदी बाजारात विकायला येतात आणि या रानभाज्या वर्षातून एकदाच भेटतात. त्या पचायला हलक्या तर असतातच परंतु आरोग्यवर्धक देखील असतात, त्यामुळे या महिन्यात रानभाज्या खाणे हिताचे असते असं मानलं जातं. अगदी आपल्या प्राचीन आयुर्वेदात देखील रानभाज्यांचे महत्व विशद केलेले आहे.
आषाढातील ही अमावास्या दीप पूजन करून भारतीय संस्कृतीचे जतन करूया आणि खोट्या, विनाशकारी, विपरीत समाजांना तिलांजली देऊया….