You are currently viewing चिपळूण पुरग्रस्तांच्या घरांमधील लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम जाणार

चिपळूण पुरग्रस्तांच्या घरांमधील लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम जाणार

कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचे नियोजन

चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील लाईटची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून १०० इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूण येथे पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
शुक्रवार ६ ऑगस्ट व शनिवार ७ ऑगस्ट या दोन दिवशी हे मदतकार्य केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या घरांमध्ये लाईट दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात वीज फिटिंगसाठी आवश्यक असणारे साहित्य लागणार आहे.
तरी दानशूर व्यक्तींना पूरग्रस्तांसाठी वीज संबंधित असलेले साहित्य वायर, बल्ब, केसिंग पट्टी, होल्डर,स्विच, ट्रीपर, आदी वस्तूंची मदत करावयाची असल्यास कुडाळ व मालवण शिवसेना शाखेमध्ये मदत जमा करावी. तसेच लाईट फिटिंगच्या मदतकार्यासाठी जिल्ह्यातील इलेक्ट्रिशियन चिपळूण येथे जाण्यास इच्छुक असतील तर त्यांनी देखील कुडाळ सरपंच संघटना अध्यक्ष सचिन कदम- ९४२१९९०३९९ व मालवण सरपंच संघटना अध्यक्ष नंदू गावडे ९४२०२१००१३ यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करावी असे आवाहन कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा