You are currently viewing देवगड भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली केंद्रीय उद्योगमंत्री राणेंची दिल्लीत भेट

देवगड भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली केंद्रीय उद्योगमंत्री राणेंची दिल्लीत भेट

विजयदुर्ग बंदर निर्मितीला चालना देण्याची केली मागणी

देवगड

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची देवगड तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी रविवारी 1 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे जात सदिच्छा भेट घेतली. केंद्रीय उद्योगमंत्रीपदी निवड झाल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश असल्याने मंत्री राणेंचा दिल्ली मुक्काम वाढला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी देवगड तालुक्यातील भाजपा जिल्हा सरचिटणीस अरीफ बगदादी, पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, पं. स. उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, संदीप साटम, उत्तम बिर्जे, शैलेश लोके, अंकुश ठुकरुल, संतोष तावडे आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्ली गाठली.

या भेटीदरम्यान विजयदुर्ग बंदर निर्मितीच्या भिजत पडलेल्या घोंगड्याकडे विशेष करून उद्योगमंत्री राणेंचे लक्ष वेधण्यात आले. जेएनपिटी पेक्षाही जास्त नैसर्गिक खोली असणारे भारतातील विजयदुर्ग हे एकमेव बंदर आहे. 50 लाख मेट्रिक टन मालवाहतूक करणारे अवाढव्य जहाजही विजयदुर्ग बंदरापासून केवळ 50 मीटर अंतरापर्यंत येऊ शकते. जेएनपिटी बंदराची तेवढी खोली नसल्यामुळे हेच जहाज जेएनपीटी बंदरात हजारो किलोमीटर दूर अंतरावर थांबते. नैसर्गिक वरदान लाभलेल्या विजयदुर्ग बंदराचा विकास केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्यास त्याचा आर्थिक फायदा हा देवगड तालुक्यालाच होणार आहे. विजयदुर्ग बंदराचा विकास होण्यासाठी केंद्रात राजकीय ताकद असणे महत्त्वाचे होते.

जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या केंद्रातील राजकीय ताकदीअभावी विजयदुर्ग बंदर निर्मिती रखडली आहे. विजयदुर्ग बंदर निर्मिती ही सिंधुदुर्ग चे सुपूत्र असलेल्या केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या आवाक्यातील बाब आहे. केंद्रीय उद्योगमंत्री राणे देवगडवासीयांचे विजयदुर्ग बंदर निर्मितीचे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात उतरवू शकतात. त्यामुळे विजयदुर्ग बंदर निर्मितीला चालना देण्याची आग्रही मागणी या भेटीत देवगड भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच गिर्ये भागात मिनी एमआयडीसी सुरू करावी अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरीफ बगदादी, भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, उत्तम बिर्जे यांनी उद्योगमंत्री राणेंकडे केली. मिनी एमआयडीसी उभारल्यास येथे होणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे परिसरातील युवकांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळेल. मिनी एमआयडीसी साठी आवश्यक असणारे स्थानिक पातळीवरील सर्व सहकार्य केले जाईल. गिर्ये परिसरात मिनी एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणीही यावेळी केंद्रीय उद्योगमंत्री राणेंकडे करण्यात आली.

विजयदुर्ग बंदर निर्मितीबाबत सविस्तर चर्चा केंद्रीय उद्योगमंत्री राणेंनी केली. बंदर निर्मितीबाबत आणि मिनी एमआयडीसी बाबत आपण सकारात्मक असून या दोन्ही मागण्या प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय उद्योगमंत्री राणेंनी देवगड तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना या भेटीदरम्यान दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा