You are currently viewing “कोकणातील पूरग्रस्तांसाठी 200 कोटींचे विशेष पॅकेज द्या”

“कोकणातील पूरग्रस्तांसाठी 200 कोटींचे विशेष पॅकेज द्या”

-शिवसेना युवानेते संदेश पारकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

“संपूर्ण कोकणात नुकतीच उद्भवलेली भयानक पूरस्थिती आणि महाप्रलायामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे,” अशी मागणी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेद्वनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये शासन स्तरावर विशेष अभ्यास गट नेमणे, निसर्गाच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास असणाऱ्या जुन्याजाणत्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मते व मार्गदर्शक सुचना जाणून घेणे, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या प्रवाहचे सर्वेक्षण करुन नदीपात्रातील गाळ प्राधान्याने उपसा करून नदीपात्रे खोल करणे, पुरामुळे बरेच दिवस गावे अंधारात राहू नये म्हणून पूरस्थितीजन्य गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या बसवणे, बरीच वर्षे जुने झालेले पुल, बंधारे, मोऱ्या यांचा सर्वे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना करुन निधी उपलब्ध करणे, दरवर्षी अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांवर, पुलांवर, नदींवर पूरस्थिती निर्माण होते तेथील नागरीकांना पर्यायी मार्ग व आपत्कालीन निवारा केंद्रे उभारणी करणे, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी NDRF च्या धर्तीवर एक रेस्क्यू टीम सदैव तैनात ठेवणे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आधुनिकीकरण करणे, नैसर्गिक प्रवाह बुजवून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या महामार्गाच्या कामांचे सर्वक्षण करुन स्ट्रक्चरल ऑडिट करणे, कोकणातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, कोरोना काळात आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टर, नर्स, शिपाई व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करुन घ्यावे व या कोकणातील जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कोकणला दोनशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्यात यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा