आली सर पावसाची
आली सर पावसाची
पावसाची गट्टी जमली
जमली ढगांशी मैत्री
मैत्री पाण्यातही रमली.
रमली सर येता धावूनी
धावूनी वारा दिमतीला
दिमतीला विजाही येती
येती छेडण्या धरणीला.
धरणीला भिजवी चहूकडे
चहूकडे हिरवाई पसरे
पसरे आनंदाची लाट
लाट दावी रूप हसरे.
हसरे रान वेली ही न्हाली
न्हाली अवघी ही धरती
धरती व्याकूळ ओढीने
ओढीने धावे डोंगरा वरती.
वरती आभाळ मेघांनी भरले
भरले शिवारात या पाणी
पाणी अमृत होऊनी बरसे
बरसे आभाळ मोत्यावाणी.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६